क्रूरतेचा कळस! व्यक्तीने थेट गोळ्या घालून 25 कुत्र्यांना ठार मारले, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप

Rajasthan Man kills over 25 dog

Rajasthan Man kills over 25 dogs: सध्या देशभरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. भटकी कुत्री चावल्याने रेबीजमुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यातच आता राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात एका व्यक्तीने 2 दिवसांत 25 हून अधिक कुत्र्यांची गोळ्या घालून क्रूर हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. आरोपी शिवचंद बावरियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो हातात बंदूक घेऊन गावात फिरत असताना आणि कुत्र्यांना गोळ्या घालताना दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर आणि शेतात रक्ताने माखलेल्या कुत्र्यांच्या मृतदेहांचा थरार दिसतो. पळून जाणाऱ्या कुत्र्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती दुचाकीवरून जाताना कुत्र्यांवर गोळीबार करताना दिसतात. तिसरी व्यक्ती दुसऱ्या दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे दिसत आहे.

पोलीसांची कारवाई

पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, हमीरी कलां गावाच्या माजी सरपंच सरोज झांजरिया यांनी या प्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी सांगितले की, शिवचंदने गेल्या काही दिवसांत 25 कुत्र्यांना निर्दयीपणे मारले आहे. आरोपीने कुत्र्यांनी त्याच्या बकऱ्यांना मारल्याचा जो दावा केला होता, तो सरोज यांनी फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, या कुत्र्यांनी कोणत्याही माणसाला किंवा इतर प्राण्यांना नुकसान पोहोचवले नव्हते.

सरोज यांनी हा प्रकार एक सुनियोजित कट असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, पाच महिन्यांपूर्वीही याच टोळीने गावात येऊन अशाच प्रकारची कृत्ये केली होती. प्राणीप्रेमी आणि नागरिकांनी या क्रूर कृत्याचा निषेध केला असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे.