Nitin Gadkari on Ethanol Blended Petrol: पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्यामुळे (Ethanol Blended Petrol) वाहनांचे मायलेज कमी होते, या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे. गेल्याकाही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता गडकरींनी हे वक्तव्य केले.
“हा चर्चेचा विषयच नाही. राजकीय भाषेत बोलायचे झाल्यास, असे वाटते की पेट्रोलियम लॉबी या गैरसमजाला खतपाणी घालत आहे,” असे ते म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “तुम्ही मला जगातील एक तरी असे वाहन दाखवा, ज्याला ई-20 पेट्रोलमुळे समस्या निर्माण झाली आहे. मी खुले आव्हान देतो, ई-20 पेट्रोलमुळे कोणतीही अडचण येत नाही.”
याच आठवड्यात पेट्रोलियम मंत्रालयानेही (Petroleum Ministry) जाहीर केले होते की, या इंधनामुळे इंजिनचे मोठे नुकसान किंवा कामगिरीत घट झाल्याचे आढळून आलेले नाही. मात्र, नवीन गाड्यांमध्ये 2 टक्के आणि जुन्या गाड्यांमध्ये 6 टक्के मायलेज कमी होऊ शकते, असे मंत्रालयाने मान्य केले.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मंत्रालयाने म्हटले होते की, काही जुन्या वाहनांमध्ये 20,000 ते 30,000 किलोमीटर चालल्यानंतर रबरचे भाग किंवा गॅस्केट बदलण्याची गरज भासू शकते, पण हा खर्च कमी असतो आणि तो नियमित सर्व्हिसिंगमध्ये केला जातो.”
गडकरी यांनी असा युक्तिवाद केला की, यामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील (GDP) शेतीचा वाटा सध्याच्या 12 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत वाढेल. भविष्यात 100 टक्के इथेनॉल हेच इंधन असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.