जो रूट मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम? 158 सामन्यांनंतर आकडेवारी काय सांगते? वाचा

Joe Root vs Sachin Tendulkar Test Cricket Records

Joe Root vs Sachin Tendulkar Test Cricket Records: विक्रम हे मोडण्यासाठीच बनतात असे क्रिकेट विश्वात म्हटले जाते. याची उदाहरणे देखील अनेकदा पाहायला मिळतात.

इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूट (Joe Root) सध्या क्रिकेट विश्वात चर्चेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम मोडणारा तो सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) प्रबळ दावेदार मानला जातोय.

नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतही रूटने दमदार कामगिरी केली. त्याने 3 शतके झळकावत 537 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting), जॅक कॅलिस (Jack Kallis) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले.

सध्या सचिन तेंडुलकर (15,921 धावा) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर जो रूट (13,543 धावा) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोघांमध्ये आता फक्त 2,378 धावांचे अंतर राहिले आहे. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 200 सामने खेळले आहेत, तर रूटने आतापर्यंत 158 सामने खेळले आहेत.

158 कसोटी सामन्यांनंतर सचिन आणि रूटची आकडेवारी

जो रूटने आतापर्यंत खेळलेल्या 158 कसोटी सामन्यांनंतरची तुलना सचिन तेंडुलकरच्या 158 सामन्यांनंतरच्या कामगिरीशी करूया.

  • खेळलेल्या डावांची संख्या: 158 सामन्यांमध्ये सचिनला 259 डावांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, तर जो रूटने आतापर्यंत 288 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. म्हणजेच, रूटने सचिनपेक्षा 29 डाव जास्त खेळले आहेत.
  • एकूण धावा: 158 कसोटी सामन्यांनंतर सचिनच्या नावावर 12,702 धावा होत्या, तर जो रूटने या टप्प्यापर्यंत 13,543 धावा केल्या आहेत. म्हणजेच, रूटने सचिनपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
  • शतके आणि अर्धशतके: शतकांच्या बाबतीत जो रूट सचिनच्या मागे आहे. सचिनने 158 सामन्यांमध्ये 42 शतके झळकावली होती, तर रूटच्या नावावर 39 शतके आहेत. मात्र, अर्धशतकांच्या बाबतीत रूट पुढे आहे. सचिनने 52 अर्धशतके केली होती, तर रूटने 66 अर्धशतके झळकावली आहेत.
  • सरासरी: फलंदाजीच्या सरासरीमध्ये मात्र जो रूट सचिनच्या मागे आहे. 158 कसोटी सामन्यांनंतर सचिनची सरासरी 54.75 होती, तर रूटची सरासरी सध्या 51.29 आहे.