50 Years of Sholay: 50 वर्षांनंतरही ‘शोले’ची चर्चा; चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर आणीबाणीचा कसा परिणाम झाला?वाचा

50 Years of Sholay

50 Years of Sholay: ‘शोले’ (Sholay) हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी (50 Years of Sholay) एक मानला जातो. शोले प्रदर्शित होऊन जवळपास 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र आजही हा चित्रपट अनेकजण आवडीने पाहतात. ‘शोले’ 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला होता.

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी आणि अमजद खान यांसारख्या दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या या चित्रपटाने मैत्री, ॲक्शन आणि खलनायक यांच्या व्याख्याच बदलल्या. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, या चित्रपटावर तत्कालीन राजकीय परिस्थितीचा म्हणजेच आणीबाणीचा थेट परिणाम झाला होता. विशेषतः चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर आणीबाणीचा परिणाम पाहायला मिळाला होता.

2 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी 21 महिने चालली आणि या काळात चित्रपटसृष्टीवर कठोर सेन्सॉरशिप नियम लादले गेले होते.

रक्ताचे डाग, दारूच्या बाटल्या आणि ॲक्शन सिन्सची संख्या व कालावधी यावरही बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत ‘शोले’च्या टीमला सेन्सॉर बोर्डच्या सूचना टाळता आल्या नाहीत.

मूळ क्लायमॅक्समध्ये काय होते?

चित्रपटाच्या मूळ क्लायमॅक्समध्ये संजीव कुमार (ठाकूर) आपल्या हातांनी अमजद खान (गब्बर) चा जीव घेतो, असे दाखवले होते. हे दृश्य आधीच चित्रित झाले होते. परंतु, सेन्सॉर बोर्डला वाटले की आणीबाणीच्या काळात एका माजी पोलीस अधिकाऱ्याने कायदा हातात घेणे चुकीचा संदेश देईल. त्यामुळे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना नवीन क्लायमॅक्स शूट करण्यास भाग पाडण्यात आले.

या नवीन क्लायमॅक्समध्ये, ठाकूर गब्बरला मारणार इतक्यात पोलीस येतात आणि त्याला अटक करतात. या बदलामुळे चित्रपटाच्या कथेतील मूळ भावनेला धक्का बसला असला तरी, त्या वेळी सेन्सॉरशिपचे नियम पाळणे हाच एकमेव पर्याय होता.

‘शोले’ आणीबाणी लागू झाल्यानंतर काही आठवड्यांनी प्रदर्शित झाला होता, त्यामुळे टीमला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मूळ क्लायमॅक्ससह शोले पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता.