Astronomy Olympiad in Mumbai: मुंबईत 18 वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र (Astronomy Olympiad in Mumbai) आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. 11 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे दशकानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेचे मुंबईत पुनरागमन होत आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे आयोजित या स्पर्धेत जगभरातील 64 देशांतील सुमारे 300 विद्यार्थी सहभागी होतील. पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अणुऊर्जा विभागाच्या पाठबळाने हे आयोजन होत आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय सहकार्य, वैज्ञानिक प्रतिभा आणि खगोलशास्त्रात भारताचे वाढते प्राबल्य दर्शवणारी संधी आहे.
स्पर्धेचे स्वरूप
ही स्पर्धा उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी असून, त्यांचे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमधील ज्ञान, विश्लेषण आणि निरीक्षण क्षमता तपासली जाईल. यात सैद्धांतिक परीक्षा, डेटा विश्लेषण, आकाश निरीक्षण आणि सांघिक स्पर्धा अशा चार मुख्य परीक्षा असतील.याचा उद्देश विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, सहकार्य आणि संवादाचे महत्त्व शिकवणे आहे.
भारताने या ऑलिंपियाडमध्ये सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र दरवर्षी राष्ट्रीय निवड प्रक्रिया राबवते. यात पहिली चाचणी, दुसरी सखोल परीक्षा आणि 18 दिवसांचे प्रशिक्षण शिबीर असून, यातून पाच विद्यार्थ्यांची निवड होते. 2011 मध्ये भारताने 5 सुवर्ण पदके जिंकली होती आणि सध्या 80 टक्क्यांहून अधिक संधी पदक मिळवण्याची आहे.
विद्यार्थ्यांना फायदे
ही स्पर्धा विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची, तर्कशुद्ध विचार आणि विश्लेषण क्षमता वाढवते. पदक विजेत्यांना शिष्यवृत्ती, प्रवेश संधी आणि संशोधन इंटर्नशिप मिळतात. शिक्षकांना खगोलशास्त्र शिकवण्याचे आधुनिक तंत्रही शिकायला मिळते. हे आयोजन भारताला जागतिक वैज्ञानिक समुदायात अग्रगण्य बनवेल.