‘आज रतन टाटा असते तर…’, एअर इंडिया अपघात पीडितांच्या वकिलांचे मोठे विधान; भरपाईच्या दिरंगाईवर टीका

Air India Plane Crash

Air India Plane Crash: जून 2025 मध्ये अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या अपघातात 250 पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याची घोषणा एअर इंडियाने केली होती. मात्र, अद्याप काही जणांना भरपाई मिळाली नसल्याचे समोर आले आहे.

या भीषण अपघातातील 65 हून अधिक कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख वकील माईक अँड्र्यूज यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास होत असलेल्या दिरंगाईवर टीका केली आहे. जर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हयात असते, तर अशी अडथळ्यांची प्रक्रिया अस्तित्वात नसती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

अँड्र्यूज म्हणाले की, रतन टाटांचा नम्र स्वभाव आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा वारसा यामुळे मृतांच्या कुटुंबांना अशा प्रक्रियात्मक अडथळ्यांना सामोरे जावे लागले नसते.

ते म्हणाले, “अमेरिकेतही आम्हाला रतन टाटा कोण होते, हे माहीत आहे. त्यांचे कार्य आणि लोकांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव आम्हाला माहीत आहे. आम्हाला विश्वास आहे की, जर ते आज येथे असते, तर पीडित कुटुंबांना भरपाईसाठी इतका विलंब झाला नसता.”

अँड्र्यूज म्हणाले की, “एका वृद्ध महिलेचा एकुलता एक मुलगा, जो कुटुंबाचा एकमेव आधार होता, तो अपघातात मरण पावला. ती तिच्या आरोग्याच्या खर्चासाठी मुलावर अवलंबून होती. आता तो मृत आहे. त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यांनी आता काय करायचे? ते आता जगाच्या दयेवर आहेत.”

दरम्यान, एअर इंडियाने अपघातातील 229 प्रवाशांपैकी 147 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची अंतरिम भरपाई दिली आहे. ही रक्कम अंतिम भरपाईमधून समायोजित केली जाईल. या व्यतिरिक्त, टाटा समूहाने ‘एआय-171 मेमोरियल अँड वेल्फेअर ट्रस्टस्थापन केला आहे. या ट्रस्टने प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.