नवी दिल्ली – मागील आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे (Congress) खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले होते. त्यांनी मतदार चोरी आणि मतदार यादीतील गैरप्रकार देशभर कशा पद्धतीने राबवले गेले, हे विविध यादींचे पुरावे दाखवत स्पष्ट केले होते. या आरोपांनंतर तीन राज्यांच्या निवडणूक आयोगांनी त्यांना नोटीस बजावली. आज याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने (india alliance) संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालय असा मोर्चा काढला. या आंदोलनात त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), खासदार प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi), शशी थरूर (Shashi Tharoor), जयराम रमेश(Jairam Ramesh) , शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हे (Amol Kolhe) ,उबाठा (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देसाई (Anil Desai) , प्रियांका चतुर्वेदी, अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे (samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav), खासदार डिंपल यादव, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) आणि सयानी घोष (Sayani Ghosh) यांसह २५ पक्षांचे सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाची तयारी सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या बैठकीच्या वेळेची चर्चा रंगली. आयोगाने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना पत्र पाठवून, दुपारी १२ वाजता केवळ ३० सदस्यीय शिष्टमंडळालाच बोलावले, जागेअभावी ही अट असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने केवळ ३० जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी दिल्याने विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी सर्व खासदार एकत्र जातील, अन्यथा कोणीही जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर मोर्चाला संसद भवनाच्या मकर द्वारातून सुरुवात झाली. मात्र वाहतूक भवनाजवळ पोहोचताच दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा थांबवला. यावेळी महुआ मोइत्रा आणि सयानी घोष यांनी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली, तर अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही खासदार जमिनीवर ठिय्या देऊन बसले, तर रणदीप सुरजेवाला यांनी बोल रहा है पूरा देश, वोट हमारा छूके देख अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, निदर्शनादरम्यान महुआ मोइत्रा आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग बेशुद्ध पडल्या. मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून पोलिसांनी सर्व खासदारांना ताब्यात घेतले.