पुणे – पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसामिमित्त व्हॉइस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काॅंग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय ) या विद्यार्थी संघटनेने इतर समविचारी विद्यार्थी संघटनांसह या स्पर्धेच्या विषयाला विरोध केला. ही स्पर्धा म्हणजे राजकीय अजेंडा असल्याचा आरोप करत या विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठात आंदोलन केले. यानंतर विद्यापीठाने स्पर्धेचे परिपत्रक मागे घेतले. मात्र, आयोजक असलेल्या संस्थेने स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर केलेले नाही. यावरून आता वाद सुरू झाला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विद्यापीठावर सडकून टीका केली आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांच्यातर्फे ५ ऑगस्ट रोजी या वक्तृत्व स्पर्धेबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. या स्पर्धेचे ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’ हे नाव वाचून अनेकांना धक्का बसला. या परिपत्रकात म्हटले आहे की, विकसित महाराष्ट्र या विषयाला आधारून राज्यभरातील युवकांमध्ये वक्तृत्वातून कृती आणि कृतीतून नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान व आय-फेलोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील १४ ते २५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेसाठी २ ते ३ मिनिटांचे मराठी भाषण व्हिडिओ स्वरूपात दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावे.
एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने या स्पर्धेच्या नावाला आक्षेप घेत ती राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार असल्याचा आणि विद्यापीठात राजकीय अजेंडा चालवला जात असल्याचा आरोप केला. या स्पर्धेविरोधात समविचारी विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठाने काढलेले परिपत्रक पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली. जोपर्यंत सुधारित परिपत्रक हातात मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर सदानंद भोसले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या स्पर्धेचे आयोजक स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान व आय-फेलोज फाउंडेशन यांनी स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर न केल्याने वाद सुरू राहिला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यात उडी घेत विद्यापीठाला धारेवर धरले.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पत्र मागे घेण्याची उपरती झाली. पण या स्पर्धेचे विद्यापीठाने आयोजन केले नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेले पत्र मागे घ्यायचे, हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे. शिक्षणाचे मंदिर असलेल्या विद्यापीठांच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर असे अनेक विषय आहेत. महिन्याअखेरपर्यंत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखोल करू.
उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्ञानदानासारखे पवित्र कार्य जिथे चालते अशा विद्यापीठाला तरी किमान राजकारणापासून अलिप्त ठेवावे. मात्र, व्हॉइस ऑफ देवेंद्र सारखी वक्तृत्व स्पर्धा भरवण्यासाठी स्वत: विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने त्यासाठी हालचाली कराव्यात आणि विद्यापीठाने परिपत्रक काढावे हे अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीची परिपत्रके बघितली की विद्यापीठांची स्वायत्तता गहाण पडली आहे का हा प्रश्न वारंवार येतो . व्हॉइस ऑफ देवेंद्रसाठी जर तुम्ही पत्रक काढत असाल, तर उद्या आम्ही तुम्हाला वादविवाद स्पर्धेचे पत्रक देतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मतांची चोरी करून मुख्यमंत्री पद मिळवले का? या विषयाचे आमच्या स्पर्धेचे पत्रक आपल्या सगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवाल, अशी अपेक्षा आहे.
या स्पर्धेचे समन्वयक वैभव सोलनकर म्हणाले की, ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली नाही. रोहित पवार अत्यंत खोटारडा माणूस आहे. ते ट्विट करुन ते खोटी माहिती महाराष्ट्राला देत आहेत., शरदचंद्र पवार यांच्या नावाने तुम्ही विद्या प्रतिष्ठान, शारदा प्रतिष्ठान आणि रयत शिक्षण संस्थेत स्पर्धा आयोजित करता, तेव्हा तुम्हाला हे दिसत नाही?
पुणे विद्यापीठात हा वाद चालू असतानाच नागपूरमध्ये पुढच्या महिन्यात व्हॉईस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा नागपूरचे भाजपा नेते बबलू गौतम यांनी केली.