जैसलमेर – राजस्थानच्या जैसलमेर येथील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळील संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) गेस्ट हाऊस(Guest House)चा कंत्राटी व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय(Pakistan Intelligence Agency ISI) साठी हेरगिरी केल्याप्रकरणी सीआयडी इंटेलिजन्सने (CID Intelligence) अटक केली आहे. त्याच्यावर डीआरडीओ शास्त्रज्ञ व भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या हालचालींसह शस्त्रास्त्र चाचण्यांशी संबंधित गोपनीय माहिती (Confidential information) पाकिस्तानी हँडलर्सना पुरवल्याचा आरोप आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग (CID) च्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील अल्मोरा येथील रहिवासी महेंद्र प्रसाद सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संपर्कात होता. त्याने मिळवलेली माहिती मिसाइल आणि इतर शस्त्रास्त्र चाचण्यांसाठी फायरिंग रेंजवर येणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित होती. त्याच्या मोबाईल फोनच्या तपासणीतही याचे पुरावे मिळाले. १२ ऑगस्ट रोजी ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. सध्या तो सीआयडीच्या ताब्यात असून, पुढील तपासात त्याच्या संपर्कातील इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुनर्विचाराची गरज निर्माण झाली आहे.