Rahul Gandhi: काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुणे न्यायालयात (Pune Court) त्यांच्या वकिलाने दाखल केलेले एक लेखी निवेदनमागे घेणार आहेत. या निवेदनात ‘त्यांच्या जीविताला धोका’ असल्याचे म्हटले होते.
हे प्रकरण विनायक दामोदर सावरकरयांच्यावर केलेल्या टिप्पणीशी संबंधित मानहानीच्या खटल्याशी जोडलेले आहे. हा मानहानीचा खटला नोव्हेंबर 2022 मध्ये अकोला येथे ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून दाखल करण्यात आला आहे. त्या भाषणात त्यांनी सावरकरांना ‘ब्रिटिशांचा नोकर’ म्हटले होते, असा आरोप सत्यकी सावरकर यांनी केला आहे.
राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, ‘सावरकर यांच्यावरील टिप्पणी आणि ‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.’ मात्र, आता ते हे निवेदन मागे घेणार आहेत.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ‘X’ वर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली. “राहुल गांधी यांच्या संमतीशिवाय आणि सल्लामसलत न करता हे निवेदन दाखल करण्यात आले होते. राहुलजींना ते मान्य नाही, त्यामुळे उद्या त्यांचे वकील हे निवेदन कोर्टातून मागे घेतील,” असे श्रीनेत यांनी म्हटले आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात काय होते?
याआधी राहुल गांधींच्या वकिलाने अर्जात म्हटले होते की, फिर्यादी सत्यकी सावरकर हे महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या वंशाचे थेट वारसदार आहेत. ‘फिर्यादीच्या वंशाचा हिंसा आणि संविधानविरोधी प्रवृत्तींचा इतिहास आहे.’ असे अर्जात म्हटले होते.
‘सत्यकी सावरकर यांचे तथाकथित आजोबा ज्या विचारधारेचे होते, तीच विचारधारा सध्या राजकीय सत्तेत आहे, त्यामुळे कोर्टावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो,’ असा आरोपही अर्जात करण्यात आला होता.
या अर्जात राहुल गांधींनी म्हटले होते की, त्यांच्या ‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे राजकीय विरोधक चिडले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवणित सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींना ‘देशाचा नंबर वन दहशतवादी’ म्हटले होते, तर भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनीही धमक्या दिल्या होत्या.