Home / देश-विदेश / निवडणूक आयोग-राहुल गांधी वाद; ‘मतचोरी’ आरोपांवर आयोगाचा पलटवार; दिले ‘हे’ उत्तर

निवडणूक आयोग-राहुल गांधी वाद; ‘मतचोरी’ आरोपांवर आयोगाचा पलटवार; दिले ‘हे’ उत्तर

Election Commission on Rahul Gandhi's Allegations

Election Commission on Rahul Gandhi’s Allegations: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) मतदार यादीतील कथित गैरव्यवहाराच्या (Voter fraud) आरोपांवर भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने सांगितले की, मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप घेण्याची योग्य वेळ असते. योग्य कालावधीत मतदार यादीतील त्रुटीबाबत दावे आणि हरकतींची नोंद करायला हवी. तरच, त्याबाबत चौकशी करता आली असती.

आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “नुकतेच काही राजकीय पक्ष आणि व्यक्ती मतदार याद्यांमधील चुकांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. जर हे मुद्दे योग्य वेळी आणि योग्य माध्यमांद्वारे उपस्थित केले असते, तर संबंधित अधिकारी त्या चुका सुधारू शकले असते.”

प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता

निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदार याद्यांच्या तयारीमध्ये कायद्यानुसार आणि नियमांनुसार संपूर्ण पारदर्शकता बाळगली जाते. मसुदा मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर तिच्या डिजिटल आणि भौतिक प्रती सर्व राजकीय पक्षांना दिल्या जातात आणि आयोगाच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिल्या जातात.

याव्यतिरिक्त, अंतिम यादी प्रकाशित होण्यापूर्वी मतदार आणि राजकीय पक्षांना दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जातो. असे असतानाही काही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या बूथ लेव्हल एजंट्सनी (BLAs) मतदार यादीची वेळेवर तपासणी केली नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.

विरोधकांचे आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार डेटाच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा येथे “मतांची चोरी” झाली आहे.

7 ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरोप केला होता की, कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघातूनच बनावट नोंदी आणि चुकीच्या पत्त्यांमुळे 1,00,250 मतांची “चोरी” झाली आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना त्यांच्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी आणि चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून काढलेल्या किंवा समाविष्ट केलेल्या मतदारांची नावे सादर करण्यास सांगितले आहे.