रेल्वे रुळावर वनप्राण्यांचा ट्रेनची धडक बसून मृत्यू होण्यांच्या घटना वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळते. प्रामुख्याने रेल्वे रुळावर हत्तींचे अपघात होत असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. मात्र, आता हत्तींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित प्रणाली वरदान ठरली आहे.
तामिळनाडू वन विभागाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोईम्बतूर (Coimbatore) वन विभागाच्या मदुक्कराई वनक्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित एक प्रारंभिक चेतावणी प्रणाली सुरू केली होती. या प्रणालीमुळे केवळ एका वर्षात रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या 2,500 हत्तींचा जीव वाचला आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रणालीने 5,011 धोक्याचे अलर्ट दिले, ज्यामुळे वन विभागाला रेल्वे अपघातांची (Railway संख्या शून्य ठेवण्यात यश आले.
AI प्रणाली कार्य कशी करते?
- मदुक्कराई वनक्षेत्रात 12 टॉवर्सवर एआय-आधारित थर्मल कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
- हे कॅमेरे रेल्वे ट्रॅकवर 24 तास लक्ष ठेवतात.
- हत्ती दिसताच कमांड सेंटरला रिअल-टाइम अलर्ट पाठवला जातो.
- या अलर्टमुळे लोको पायलट आणि गस्त घालणाऱ्या टीमला माहिती मिळते आणि ते ट्रेनचा वेग कमी करतात.
याशिवाय, वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एआय-आधारित प्रणालीला पूरक म्हणून ड्रोनचा (Drones) वापर करण्याचीही योजना आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून दोन रेल्वे लाईन्सच्या मधल्या भागात हत्तींना ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी ड्रोन वापरले जातील.
या प्रणालीमुळे केवळ अपघातच टळत नाहीत, तर हत्तींच्या हालचाली, वर्तन आणि त्यांच्याविषयी महत्त्वाचा डेटा देखील मिळतो, जो भविष्यातील संवर्धनाच्या कामासाठी उपयुक्त ठरू शकतो.