MBBS seats Increase in India: मेडिकलचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (MBBS seats Increase in India) मिळून सुमारे 8,000 जागा वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (NMC) प्रमुख डॉ. अभिजात सेठ यांनी ही माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आरोग्य मंत्रालय आणि एनएमसीच्या काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता, ज्यामुळे या वर्षी मेडिकलच्या जागा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. सीबीआय चौकशी सुरू झाल्याने एनएमसीने नवीन जागा वाढवण्याची प्रक्रिया थांबवली होती. मात्र, आता एनएमसीने या प्रक्रियेला पुन्हा प्राधान्य दिले आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
नवीन जागा आणि प्रक्रिया (MBBS seats Increase in India)
डॉ. सेठ यांनी सांगितले की, एनएमसीकडे आलेल्या अर्जांनुसार यंदा देशभरात पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवरील मिळून अंदाजे 8,000 जागा वाढण्याची अपेक्षा आहे.
सध्या नीट-यूजीसाठी समुपदेशन सुरू आहे आणि पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा 25 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेतही नवीन जागा वाढण्याची शक्यता आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही नवीन जागांची तपासणी सुरू झाली आहे आणि समुपदेशन सप्टेंबरमध्ये होईल, असे त्यांनी सांगितले.
सध्या देशात एमबीबीएसच्या 1,18,098 जागा आहेत, त्यापैकी 59,782 सरकारी महाविद्यालयांमध्ये आणि 58,316 खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत.
NExT परीक्षा: लगेच नाही
अंतिम वर्षाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित असलेली नॅशनल एक्झिट टेस्ट (NExT) परीक्षा लवकरच होणार नाही, असे डॉ. सेठ यांनी स्पष्ट केले. ही संकल्पना चांगली असली तरी, सर्व संबंधितांमध्ये एकमत होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल असलेले प्रश्न आणि भीती दूर केली जाईल. ही परीक्षा सुरू होण्यास अजून काही वेळ लागेल, असे ते म्हणाले.
हे देखील वाचा –
सुनेत्रा पवार RSS च्या बैठकीत; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, स्वतः दिले स्पष्टीकरण
Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी