मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये जाऊन आमच्यावर टीका करतात. पण त्यांच्या आजूबाजूला दंभमेळा भरला आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रातील महायुतीचाही दंभमेळा भरला आहे. ह्यांना चांगले शिक्षक मिळाले असते तर आज देशाची ही अवस्था झाली नसती, अशी घणाघाती टीका आज उद्धव ठाकरे यांनी केली. राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी हिमालयासारखा सर्वांच्या पाठीशी आहे, पण तेवढा थंड नाही. आमचे शिक्षक आमदार चांगले काम करत आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण सक्तीने भाषा शिकवली जाणार नाही. पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगली हिंदी बोलतात, पण ती फक्त आश्वासन देण्यासाठीच वापरतात. काल त्यांनी बिहारमध्ये आमच्यावर टीका केली की, मविआ आणि इंडिया आघाडी भ्रष्टाचाऱ्यांना रक्षण देत आहे. पण मोदी तुमच्या महायुतीचा महाराष्ट्रात दंभमेळा भरला आहे. हे सर्व ढोंगी आहेत. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ते आज तुमच्यासोबत आहेत.
पुढे ते म्हणाले की, शिया अफगाणिस्तानमध्ये घुसल्यावर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. आता पाकिस्तानसोबत चीनही आहे, मग पाकिस्तान आणि चीनचा निषेध करणार का? हे न शिकल्याचा परिणाम आहे. मोदींना चांगले शिक्षक मिळाले असते, तर जगभरात भारताची प्रतिमा अशी झाली नसती. आपली शिष्टमंडळे बाहेर जातात, पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला आहे का? अमित शहाचा मुलगा जयसाठी तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार का? आता मोदींच्या रक्तातील गरम सिंदूर कुठे आहे? की ते शीतपेय झाले आहे? ही बोगस जनता पार्टी आहे. प्रामाणिक निवडणूक झाली तर हे महाराष्ट्र जिंकू शकत नाहीत. मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. जे जिंकले आहेत त्यांचे ढोंग राहुल गांधींनी उघडे पाडले आहे.
