Anurag Thakur: भाजप नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनुराग ठाकूर यांनी एका कार्यक्रमात बोलताना अंतराळात प्रवास करणारे पहिले व्यक्ती हनुमान होते असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता टीका होत आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, हनुमान हेच ‘अंतराळात प्रवास करणारे पहिले व्यक्ती’ मानले जाऊ शकतात. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता भारताच्या हजारो वर्षांच्या जुन्या परंपरांशी जोडले जाण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त एका शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.
अनुराग ठाकूर यांचे विधान
या कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, “अंतराळात प्रवास करणारा पहिला व्यक्ती कोण होता?” विद्यार्थ्यांची उत्तरे अस्पष्ट होती. त्यावर हसून उत्तर देत ठाकूर म्हणाले, “मला तर वाटते हनुमानजी होते.”
पवनसुत हनुमान जी…पहले अंतरिक्ष यात्री। pic.twitter.com/WO5pG2hAqT
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 23, 2025
आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना ठाकूर म्हणाले, “आपण आजही स्वतःला वर्तमानात पाहतो. पण जोपर्यंत आपल्याला आपली हजारो वर्षांची जुनी परंपरा, ज्ञान आणि संस्कृती माहीत नाही, तोपर्यंत आपण तसेच राहू, जसे ब्रिटिशांनी आपल्याला दाखवले आहे.”
“त्यामुळे मी तुम्हाला आणि तुमच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की, पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचा विचार करा आणि आपल्या देशाकडे, आपल्या परंपरा आणि ज्ञानाकडे पाहा. जर तुम्ही त्या दिशेने पाहिले, तर तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील,” असेही ते म्हणाले.
मात्र, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता टीका होत आहे. नेते त्यांच्या मुलांना परदेशात शिकायला पाठवतात. पण देशात मुलांना चुकीची माहिती देतात, अशा शब्दात अनेकांनी टीका केली आहे.
इस्रोच्या यशामुळे चर्चा
अनुराग ठाकूर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत अंतराळ संशोधनात नवनवीन विक्रम करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच, ग्रुप कॅप्टन शुभंशू शुक्ला हे 1984 नंतर अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर (astronaut) बनले आहेत.
यापूर्वी, 1961 मध्ये सोव्हिएत रशियाचे यूरी गागारिन (Yuri Gagarin) यांनी अंतराळात पहिल्यांदा यशस्वी प्रवास केला होता, ज्यामुळे ते अंतराळात प्रवास करणारे पहिले व्यक्ती बनले होते.
हे देखील वाचा –
‘बिग बॉस 19’ मध्ये यंदा कोण कोण? कलाकार, युट्यूबर आणि कॉमेडियनची दमदार एन्ट्री
’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप