Home / महाराष्ट्र / भाजपामध्ये जाणार कळताच वैभव खेडेकरांना मनसेतून काढले

भाजपामध्ये जाणार कळताच वैभव खेडेकरांना मनसेतून काढले

Vaibhav Khedekar MNS expelled

Vaibhav Khedekar MNS expelled – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) स्थापनेपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांची साथ देणारे वैभव खेडेकर यांची आज पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. रत्नागिरीच्या खेड-दापोलीचे मातब्बर नेते असलेले खेडेकर हे भाजप(BJP) मध्ये जाण्याची चर्चा असतानाच त्यांची पक्षातून हकालपट्टी करून मनसेने त्यांची ताकद कमी केल्याचे म्हटले जात आहे. मनसेचा राजीनामा देण्याआधीच ही हकालपट्टी करण्यात आली आहे. खेडेकरांना पक्षात घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेचे मातब्बर नेते रामदास कदम यांच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान दिले जात आहे.

नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागताच ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena) त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर बडगुजर यांचा भाजपप्रवेश अनेक दिवस खोळंबला. भाजपच्या राज्य नेतृत्वाचीही मोठी नाचक्की झाल्याचे बघायला मिळाले होते. बडगुजर यांचा नंतर अचानक एकादिवशी भाजपप्रवेश झाला. दरम्यान, खेडेकर यांनी भाजपप्रवेशाची चर्चा फेटाळून लावली. पण त्यांचे समर्थक, निकटवर्ती हे भाजपप्रवेश निश्चित असल्याचे सांगत आहेत. खेडेकर हे काही दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या एका कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांसोबत दिसले होते.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, खेडेकर यांच्यासोबतच राजापूरचे अविनाश सौंदाळकर, चिपळूणचे संतोष नलावडे आणि माणगावचे सुबोध जाधव यांनाही पक्षविरोधी कारवाई केल्यावरून बडतर्फ करण्यात आले. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या सहीने बडतर्फीचे हे पत्र जारी करण्यात आले आहे. खेडेकर हे तळकोकणातील राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते मनसेचे कोकण संघटक, राज्य सरचिटणीस होते .

मनसेच्या स्थापनेपासून २० वर्षे साथ दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर खेडेकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेटही घेतली. त्यामुळे पक्षांतर टळले असे म्हटले जात असतानाच खेडेकरांवर ही कारवाई झाली आहे. हा खेडेकर यांच्याप्रमाणेच स्वतः मनसेसाठीही मोठा झटका आहे. सध्याच्या घडीला मनसेकडे तळकोकणात खेडेकरांएवढा प्रभाव असलेला नेता नाही.

खेड-दापोलीच्या राजकारणात रामदास कदम आणि खेडेकर हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेच्या खेडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शासकीय निधी दिला जात आहे. पण सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला निधी मिळत नसल्याची जाहीर तक्रार रामदास कदम यांनी केली होती.


हे देखील वाचा-

मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला

सिंहगडावर बेपत्ता तरुण पाच दिवसांनी सापडला