Home / देश-विदेश / धनखडांचा राजीनामा तब्येतीमुळेच! अमित शहांकडून कामाचे कौतुक

धनखडांचा राजीनामा तब्येतीमुळेच! अमित शहांकडून कामाचे कौतुक

Dhankhar's resignation is due to health reasons! Amit Shah praises his work


नवी दिल्ली- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्याने देशभर खळबळ उडाली. राजीनामा दिल्यापासून धनखडांचा चेहराच दिसला नाही. त्यावरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला जाब विचारला जात असतानाच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. धनखड यांनी तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिला आहे, असा दावा शहा यांनी केला. धनखड यांच्या कामाचेही कौतुक केले. धनखड यांनीही राजीनाम्यासाठी तब्येतीचे कारण दिले होते.
एका मुलाखतीमध्ये गृहमंत्री शहा म्हणाले, धनखड हे घटनात्मक पदावर होते. आपल्या कार्यकाळात संविधानाला अनुसरून त्यांनी चांगले काम केले. तब्येतीच्या कारणावरून त्यांनी राजीनामा दिला. आता या सगळ्यांना अधिक ताणण्याची, भलत्यासलत्या दिशेने बघण्याची गरज नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, धनखड यांनी 21 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्यानंतर अमित शहा यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.
संसदेत मांडलेल्या 130 व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून शहा यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढवला. ही घटनादुरुस्ती मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच विरोधकांना तुरुंगातून सरकार चालवायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, विरोधी पक्ष तुरुंगात जाण्याची वेळ आली, तर तिथूनच सरकार चालवता येईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. ते तुरुंगाचेच मुख्यमंत्री निवासस्थान, पंतप्रधान निवासस्थानात रूपांतर करतील. डीजीपी, मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव किंवा गृह सचिव तुरुंगातूनच आदेश घेतील. शहा यांनी चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना वाचवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आणलेला अध्यादेश राहुल गांधींनी फाडला होता, असा आरोपही केला. तेव्हा अध्यादेश फाडण्याचे काय औचित्य होते? त्या दिवशी नैतिकता होती, तर ती आज नाही का? कारण तुम्ही सलग तीन निवडणुका हरला आहात, असा निशाणा शहा यांनी चढवला.