Home / मनोरंजन / ‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…

‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…

Riteish Deshmukh Maratha Reservation Post

Riteish Deshmukh Maratha Reservation Post: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक (Maratha Reservation) मुंबईत दाखल झाले आहेत.

जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

मनोज जरांगेंच्या या उपोषणादरम्यान, आता राजकीय क्षेत्रासह मनोरंजन विश्वातूनही त्यांना पाठिंबा दिला जात. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) एक्स (ट्विटर) पोस्ट शेअर करत या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी इच्छा रितेशने व्यक्त केली आहे.

पोस्टमध्ये रितेश म्हणाला की, ‘सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा.’ त्याने मनोज जरांगे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली असून, लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा आणि मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रितेश देशमुखने केलेल्या या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याच्या भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी ‘पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख का नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, राज्याच्या विविध भागातून शेकडो वाहने मुंबईत दाखल झाल्यामुळे शहरात शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. तसेच, आझाद मैदानात मुसळधार पावसामुळे चिखल झाल्याने अनेक आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनजवळ आश्रय घेतला. तसेच, या आंदोलन करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

पंजाबमध्ये महापुराचा कहर! मदतीसाठी लष्करही पोहोचले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण २८ व्या आरोपीला अटक