Home / देश-विदेश / ‘अमित शाह यांचे शीर कापून…’, महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान; भाजपने दाखल केली तक्रार

‘अमित शाह यांचे शीर कापून…’, महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान; भाजपने दाखल केली तक्रार

Mahua Moitra Controversy

Mahua Moitra Controversy: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी रोखण्यात शाह अपयशी ठरल्याचा आरोप करत, ‘अमित शाह यांचे शीर कापून टेबलवर ठेवावे’, असे कथित वादग्रस्त विधान मोईत्रा यांनी केले.

या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपकडून देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे तपासली गेली नाही.

त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार टीका होत आहे. या विधानानंतर भाजपने (BJP) तात्काळ पलटवार करत, हे वक्तव्य ‘अतिशय आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण’ असल्याचे म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी सीमा सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकार टाळत असल्याचा आरोप केला. या कथित व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “ते वारंवार घुसखोरांबद्दल बोलतात, पण भारताची सीमा पाच सुरक्षा दलांद्वारे संरक्षित आहे आणि ती थेट गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “पंतप्रधान स्वतः लाल किल्ल्यावरून म्हणाले की घुसखोर लोकसंख्या बदलत आहेत, पण ते हे बोलत असताना त्यांचे गृहमंत्री पहिल्या रांगेत उभे राहून हसत आणि टाळ्या वाजवत होते.”

यापुढे त्यांनी अमित शाह यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ला चढवत म्हटले, “जर आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कोणी नसेल, दुसऱ्या देशातील लोक रोज आपल्या देशात घुसखोरी करत असतील, जर आपले नागरिक घुसखोर आपल्या आया-बहिणींवर वाईट नजर ठेवत आहेत आणि आपली जमीन हडप करत आहेत अशी तक्रार करत असतील, तर सर्वात आधी तुम्ही अमित शाह यांचे शीर कापून तुमच्या टेबलवर ठेवावे.”

महुआ मोईत्रा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाजपने त्यांच्याविरोधात नदिया जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भाजपने हे विधान ‘अत्यंत आक्षेपार्ह’ आणि ‘लोकशाहीच्या चर्चेचा अपमान’ असल्याचे म्हटले आहे. यावर तृणमूल काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…

पंजाबमध्ये महापुराचा कहर! मदतीसाठी लष्करही पोहोचले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण २८ व्या आरोपीला अटक