Home / क्रीडा / इरफान पठाण, धोनी आणि ‘हुक्का’ वाद; नक्की काय घडले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

इरफान पठाण, धोनी आणि ‘हुक्का’ वाद; नक्की काय घडले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Irfan Pathan-MS Dhoni hookah controversy

Irfan Pathan-MS Dhoni hookah controversy: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण त्याच्या जुन्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. MS धोनीच्या नेतृत्वाखाली संघातून अचानक बाहेर काढण्यावर त्याने केलेल्या टिप्पण्यांमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पठाणने धोनीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या व्हिडिओ इरफानने केलेल्या हुक्क्याचा विषय चर्चेत आला आहे. यावरून सोशल मीडियावर मीम्स देखील शेअर केले जात आहेत.

करिअरचा अचानक शेवट आणि धोनीवर सूचक टिप्पणी

इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द 2012 मध्ये अचानक संपुष्टात आली, विशेष म्हणजे त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. संघातून बाहेर काढण्याचे कारण आजपर्यंत स्पष्ट झाले नाही, परंतु पठाणने अनेकदा धोनीच्या कर्णधारपदाखाली परिस्थिती कशी हाताळली गेली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एका जुन्या मुलाखतीमध्ये त्याने 2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक घटना सांगितली. मीडियामध्ये असे वृत्त आले होते की धोनी त्याच्या गोलंदाजीवर नाराज होता. यावर त्याने थेट धोनीशी बोलून स्पष्टीकरण मागितले.

पठाण म्हणाला, “मी धोनीला विचारले. माही भाईने मीडियात वक्तव्य केले होते की इरफान चांगली गोलंदाजी करत नाहीये. मला वाटले मी चांगली गोलंदाजी केली आहे, म्हणून मी त्याला विचारले. कधीकधी मीडियात वक्तव्ये फिरवली जातात. धोनी म्हणाला, ‘असे काही नाहीये, सर्वकाही नियोजनानुसार सुरू आहे’.”

यावर पुढे बोलताना पठाणने एक सूचक टिप्पणी केली. “मला कुणाच्या खोलीत ‘हुक्का’ लावून बसण्याची किंवा अशा गोष्टींवर बोलण्याची सवय नाही. सर्वांना माहीत आहे. कधीकधी याबद्दल न बोलणे चांगले असते. एका क्रिकेटपटूचे काम मैदानात चांगली कामगिरी करणे आहे, आणि मी नेहमी त्याच गोष्टीवर लक्ष दिले.”

धोनीच्या ‘हुक्का’ टिप्पणीवरून वाद

पठाणच्या या जुन्या ‘हुक्का’ टिप्पणीवरून इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक यूजर्सनी हे वक्तव्य धोनी आणि त्याच्या जवळील खेळाडूंच्या दिशेने असल्याची शक्यता व्यक्त केली. अनेकांनी 2010 च्या दशकातील धोनीच्या संघाच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.

या वादावर एका चाहत्याने X (ट्विटर) वर इरफानला थेट प्रश्न विचारला, “पठाण भाई, वो हुक्का का क्या हुआ?” यावर इरफानने दिलेले खोचक उत्तर चर्चेत आले आहे. यावर उत्तर देताना त्याने लिहिले की, , “मी आणि MS धोनी सोबत बसून पिणार.”

यानंतर त्याने एका दुसऱ्या पोस्टमध्ये, हा जुना व्हिडीओ आताच समोर येण्यामागे कारण असल्याचेही सांगितले.. “अनेक वर्षांपूर्वीचा व्हिडीओ चुकीच्या संदर्भासह आता व्हायरल झाला आहे. फॅन वॉर? PR लॉबी?” असे प्रश्नचिन्ह त्याने उपस्थित केले.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

 मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल

राज्यात पुढील ३ दिवस पावसाचे!अनंत चतुर्दशीलाही हजेरी लावणार