Home / महाराष्ट्र / Laxman Hake: मराठा विरूध्द ओबीसी संघर्ष सुरू! बारामतीत मोर्चा! पवार कुटुंबाला गाडा! लक्ष्मण हाकेंचा लढा

Laxman Hake: मराठा विरूध्द ओबीसी संघर्ष सुरू! बारामतीत मोर्चा! पवार कुटुंबाला गाडा! लक्ष्मण हाकेंचा लढा

Laxman Hake
बारामती- मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाची प्रचंड ताकद दाखवत मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळण्याचा शासन निर्णय करवून घेतल्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी ओबीसींना रस्त्यावर उतरविण्याची भाषा सुरू केली आहे. जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. पवार कुटुंबाला गाडा, असे ते आज बारामतीत काढलेल्या ओबीसी मोर्चात म्हणाले. दोन समाज आता एकमेकांच्या विरोधात जुंपले जातील. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोण चाल करतो हे पाहावे लागेल. एकूणच सर्वांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे उघड दिसत आहे.
मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देऊन मराठा समाज संपवला असा आरोप करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट बारामतीत मोर्चा काढत पवारांवर आरोप केले. या मोर्चात धनगर, माळी व बारा बलुतेदार सामील असल्याचा त्यांनी दावा केला. पहिला मोर्चा बारामतीत निघाला. गणेशोत्सव संपताच नागपूर , पुणे , मुंबईत मराठा मोर्चांपेक्षा मोठे मोर्चे काढणार आहोत असा इशारा यावेळी नेत्यांनी दिला.
लक्ष्मण हाके आज उत्साहित झाले होते. आंदोलनात जमलेली गर्दी पाहून ते बेभान होऊन बोलत होते . पूर्वी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी अशाच तऱ्हेने बारामतीत येऊन पवारांच्या विरोधात टोकाची भाषणे केली, पण नंतर राजू शेट्टी शांतच झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बारामतीत येऊन काका पुतण्याला कैदेत टाकण्याची भाषा केली आणि मग पुतण्याला सोबत घेतले, काका आपले मार्गदर्शक आहेत असे सन्मानपूर्वक उद्गार काढले. आता लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात येऊन दंड थोपटण्याचा उत्साह दाखवला आहे.
आज हाके म्हणाले की, ज्यांना संविधानाची भाषा कळते, त्यांना संविधानाने उत्तर देऊ, ज्यांना मनगटाची भाषा कळते त्यांना मनगटाने उत्तर देऊ. ज्या बारामतीकरांनी ओबीसीचे आरक्षण संपविले त्यांना जाब विचारायला आलो आहे, अजित पवार, शरद पवार, रोहित पवार यांनी जरांगेंना समर्थन दिले त्या पवार कुटुंबाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या नादाला लागायचे नाही. ओबीसी संघर्ष यात्रेचे रणशिंग आम्ही बारामतीत फुंकले आहे , आता मागे हटणार नाही, सगळीकडे आता ओबीसी मोर्चे निघतील.
दरम्यान आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रत्येक वाहिनीला मुलाखत देऊन मराठा आरक्षण जीआरचा निषेध केला. प्रतिक्रिया, सूचना न मागवता हा निर्णय कसा घेतला असा सवाल विचारत कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले. याला उत्तर देत जरांगे पाटील म्हणाले की, आता शासन निर्णय झाला आहे, कुणी कोर्टात गेले तरी काही उपयोग होणार नाही .
दरम्यान ओबीसींच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारली होती. गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकला, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली. तरीसुद्धा हाके आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आम्ही मोर्चा काढणारच. तुरुंगात टाका, आम्ही तयार आहोत. गावगाड्यातल्या ओबीसी, भटक्या-विमुक्त, शोषित आणि वंचितांसाठी ही लढाई आहे, असा निर्धार हाके यांनी जाहीर केला. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आरोप केला की, मुंबईत जरांगे पाटील यांनी परवानगीशिवाय आंदोलन केले, तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र आमच्या मोर्चासाठी परवानगी नाकारली जाते. कालच अजित पवार बारामतीत होते आणि त्यांच्या दबावाखाली पोलिसांनी आमच्या मोर्चाला परवानगी दिली नाही.
आज औंढा नागनाथ-जिंतूर मार्गावर येळी फाटा येथेही ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचा इशारा पूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार सकाळी अकरा वाजल्यापासून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव येथे एकत्र आले. या वेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने काढलेला अध्यादेश तातडीने रद्द करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी 2 वाजता मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे औंढा नागनाथ-जिंतूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती .