Home / महाराष्ट्र / ‘अनेकांना वाटलं माझी राख होतेय, पण…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

‘अनेकांना वाटलं माझी राख होतेय, पण…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Devendra Fadnavis: संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टींनी मला आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात पुढे नेले, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

By: Team Navakal
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टींनी मला आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात पुढे नेले, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या यशाचे गुपित उलगडले. मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित एका विशेष सोहळ्यात त्यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “तुम्ही या पुरस्काराला ‘फिनिक्स’ नाव दिले आहे. पण, मी काही राखेतून उभा झालेलो नाही. अनेक वेळा लोकांना असे वाटले की, माझी राख होत आहे आणि तेवढ्यात मी भरारी घेतली.”, असे सूचक वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.

मी कधी आव्हानांपासून पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांचा सकारात्मकतेने सामना केला. राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येकवेळी सकारात्मकतेने पुढे गेलो. माणसांचा कधी द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण केलं नाही, असे ते म्हणाले.

पत्रकारिता आणि पुरस्कारावर भाष्य

यावेळी त्यांनी पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीचे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचे म्हटले. “टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी,” असे ते म्हणाले. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याशिवाय, त्यांनी पुरस्कार घेणे टाळत असल्याचे सांगत, श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळेच तो स्वीकारल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेसह अनेक कामांमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला.


हे देखील वाचा –

Asia Cup 2025 स्पर्धेचे बिगुल वाजले! कधी व कुठे पाहाल भारताचे सामने? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’ आरोपांवरून वाद, ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर 3 माजी निवडणूक आयुक्तांची टीका

Web Title:
संबंधित बातम्या