इंडिया आघाडी वैचारिक लढाईत पराभूत!
- तुळशीदास भोईटे
Vice President Election 2025: उपराष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीचं मतदान मंगळवारी पार पडलं. निकालही जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी भाजपा एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) विजयी झाले. तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी (B Sudarshan Reddy) पराभूत झाले. निवडणुकीतील मतदार संसदेतील खासदार. खासदार मतदारांचं संख्याबळ समोर असल्यामुळे निकाल अपेक्षित असूनही ही निवडणूक खूपच चर्चेत राहणारी ठरली. सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपा जिंकतानाच संघानंही आपली पकड परत मिळवल्याचेही दिसते. कारण राधाकृष्णन हे संघाचे स्वयंसेवक आहेत!
एकीकडे हे घडत असतानाच इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा आणि त्यातही महाराष्ट्रातील विरोधकांची मतं असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. ही कामगिरी उमेदवार प्रतिनिधीची जबाबदारी मिळालेल्या श्रीकांत शिंदे यांनी पार पाडल्याचा म्हस्के यांचा दावा असला तरी ती आता ती नेमकी कुणाची हे कुणीही अधिकृतपणे सांगणार नसल्यानं सध्या तरी पतंगबाजी सुरु राहणार आहे.
या निवडणुकीत एकूण मतं ७८१ होती. त्यातील १४ खासदार गैरहजर राहिले. ७६७ खासदारांनी मतदान केलं. भाजपा एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन पहिल्या पसंतीच्या ४५२ मतांसह विजयी झाले. इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मतं मिळाली. भाजपा एनडीएला १५२चे मताधिक्य मिळालं. २०२२ प्रमाणेच याही निवडणुकीत १५ खासदारांची मते अवैध ठरली.
ही निवडणूक भाजपा एनडीएम आघाडीनं जिकली आहे, मात्र मताधिक्य २०२२पेक्षा कमी झाले आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२४मध्ये भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ ६३ने कमी झाले असल्यामुळे तसं घडणं स्वाभाविकच होतं. २०२२मध्ये एकूण मतं ७२५ होती. त्यापैकी जगदीप धनखड यांना ७४.३६ टक्के म्हणजे ५२८ मतं मिळाली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली होती. ३४६ मतांच्या फरकानं ते विजयी होते. १९९७नंतर झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठीच्या सहा निवडणुकांमध्ये त्यांचं मताधिक्य हे सर्वाधिक होतं. यावेळी भाजपा एनडीएचं मताधिक्य १५२वर घसरलं.
सुरुवातीला म्हणालो तसं भाजपाचं लोकसभेतील बळ ६३ने कमी झाल्यानं मताधिक्य तेवढे कमी होणं स्वाभाविकच होतं. पण २०२२मध्ये विरोधातील ५५ खासदारांना तटस्थ म्हणजे अप्रत्यक्षरीत्या विरोधात जाण्यापासून रोखू शकलेले भाजपाचे फ्लोअर मॅनेजर यावेळी काहीसे कमी पडले की काय, असं वाटू शकतं. कारण यावेळी १४ खासदारांचंच मतदान झालं नाही. खरंतर यावेळी भाजपानं खासदारांचं मॅन टू मॅन मार्किंग केलं होतं. समोरच्या इंडिया आघाडीनंही १५ खासदारांमागे एक अशी पद्धत वापरलेली. मतदान गोपनीय असतं. पक्षादेश काढू शकत नाही. त्यामुळेच अंतरात्म्याच्या आवाजाला स्मरून मतदान करा असं आवाहन या निवडणुकीत केलं जाताना दिसतं. यावेळीही तसं झालं. विरोधातील इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश रेड्डी यांच्या तोंडी सातत्यानं ते शब्द होते. पण सत्ताधारी आघाडीतील मतदारांनी तर नाहीच पण गैरहजर राहिलेल्या १४ खासदारांनीही त्यांच्या अंतरात्म्याचा कौल रेड्डींना नाही तर राधाकृष्णन यांनाच अप्रत्यक्षरीत्या दिला आहे.
या निवडणुकीत ९८% मतदान झाले, एकूण ७८१ खासदारांपैकी १४ खासदारांनी मतदान केले नाही. म्हणजेच ७६७ खासदारांनी मतदान केले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मतमोजणीपूर्वी केलेल्या दाव्यानुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या सर्वच्या सर्व ३१५ खासदारांनी मतदान केलं. म्हणजे इंडियाच्या मतदारांचे मतदान १०० टक्के झाले. पण इंडिया आघाडीच्या रेड्डींना ३०० मते मिळाली. याचा अर्थ १५ मते फुटली असा काढला जात आहे. इंडिया आघाडीच्या १५ खासदारांच्या अंतरात्म्याने एनडीएच्या बाजूने कौल दिला. ती मते नेमकी कुणाची, त्यातील महाराष्ट्रातील काही खासदारांची मते आहेत का, याचीही चर्चा आता जोरात होईलच. शिंदेंच्या शिवसेनेने त्याची सुरुवातही केली.
इंडिया आघाडीने ही निवडणूक अंतरात्माच्या आवाजाला साद घालत वैचारिक लढाई म्हणून लढल्याचा दावा केला. मात्र, इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे तेलुगु उमेदवार असूनही आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या खासदारांनी भाजपा एनडीएचे तमिळ उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना साथ दिली. २०२२मध्येही त्या पक्षाने भाजपा एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनाच मतं दिली होती. तर तेलंगणा या दुसऱ्या तेलुगूभाषिक राज्यातील भारत राष्ट्र समिती (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) या प्रादेशिक पक्षाने तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या ४ खासदारांची मतं कुणालाच मिळाली नाहीत.
एक नक्की. जास्तीत जास्त मताधिक्य मिळवत विरोधातील इंडिया आघाडीला मोठा धक्का देण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तो यशस्वी झालेला नाही. बिहार निवडणुकीपूर्वी तसं घडलं तर विरोधकांना, त्यांच्या समर्थकांचं मनोबलालाही धक्का देणं शक्य झालं असतं. पण तसं झालेलं नाही. विरोधकांना संख्याबळाची कल्पना असल्यानं निकाल अपेक्षितच होता, त्यामुळे ते वैचारिक लढाई, अंतरात्म्याचा आवाजाला आवाहन वगैरे शब्द वापरतच लढत होते. पण त्यांच्याच १५ खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज इंडिया आघाडीविरोधात ऐकणं हे धोक्याची घंटा वाजवणारेच आहे. तरीही मताधिक्य कमी होणं हेही भाजपा एनडीएसाठीही चांगलं नाही. त्यांना विजयाची खात्रीच होती. त्यामुळेच प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी सर्व एनडीए खासदार नेत्यांसाठी मंगळवारी रात्रीच्या भोजनाची तयारी दुपारपासूनच सुरु होती. तसं असलं तरी धक्का देणारं मताधिक्य मिळवू शकलेले नसल्यामुळे भोजनाला चव असेल पण त्यात २०२२सारखा विक्रमी मताधिक्याची जास्तीची चव नसेलच!
मुळात ही निवडणूक घ्यावी लागली ती तीन वर्षांपूर्वीच उपराष्ट्रपती पदावर निवडून आलेले जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे. ११ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपतीपदावर आल्यामुळे त्यांना २०२७पर्यंतची ५ वर्षांची मुदत होती. पण काही घडामोडी अशा घडल्या किंवा धनखड यांनी घडवण्याचा प्रयत्न केला की सत्ताधारी भाजपाचं राजकीय आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. किंवा सत्ताधारी भाजपाला तसं वाटलं आणि शारीरिक आरोग्य बिघडल्याचं कारण देत धनखड यांनी राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे तसंही ही निवडणूक भाजपाने एकप्रकारे ओढवून घेतलेलीच.
राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही क्लिष्ट प्रक्रिया असते. प्राधान्यक्रमाचं मतदान. त्यात पुन्हा तिथं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुरवलेला पेनच वापरत प्राधान्यक्रम लिहायचा असतो. त्यामुळे खासदार मतदार असूनही मतं अवैध ठरतात. २०२२च्या निवडणुकीत १५ मतं अवैध ठरली होती. ते टाळण्यासाठी यावेळी एनडीए आणि इंडिया दोन्ही आघाड्यांनी खासदारांना मतदानाचं खास प्रशिक्षण दिलं. तरीही मंगळवारी झालेल्या मतदानात १५ मतं बाद झाली.
सत्ताधारी असल्याचे आपले फायदे असतात. सत्तेचा वापर करत कुंपणावरच्या किंवा विरोधातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करतात. सत्तेमुळे लाभ देता येतातच, पण काहीवेळा विशेषत: २०१४नंतरच्या बदललेल्या राजकीय रणनीतीत ईडी, सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे आरोप होत असतात. मतं मिळवण्यासाठी किंवा गैरहजर किंवा तटस्थ ठेवण्यासाठी या यंत्रणांचा वापरात आणल्या जातात. मात्र यावेळी १४ खासदारच तटस्थ गैरहजर राहिले.
एकूणच निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. त्यात संघानंही गमावलेले पुन्हा कमावल्याचे मानले जाते. भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्या भाजपाला संघाची गरज राहिली नसल्याच्या विधानाचा दणका २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बसला. असहकार्यातून भाजपाला बळ दाखवणाऱ्या संघाने आपली गेलेली पकड पुन्हा मिळवली. उपराष्ट्रपतिपदी संघाच्या मुशीत तयार झालेल्या सीपी राधाकृष्णन यांची निवड संघाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याचे दाखवते. अर्थात खरेच तसे आहे का, ते भविष्यातील काही घडामोडींमधूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चा जोरात राहणार एवढे नक्की!
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल
- एकूण मतदार ७८१
- गैरहजर मतदार १४
- एकूण मतदान ७६७
- अवैध मतदान ०१५
- वैध मतदान ७५२
- भाजपा एनडीए सीपी राधाकृष्णन ४५२
- काँग्रेस इंडिया बी सुदर्शन रेड्डी ३००
*तटस्थांची ऑन रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड कारणं *
ओडिशा – बीजू जनता दल (BJD)
लोकसभा – ७ खासदार
राज्यसभा – ०
बीजू जनता दल म्हणजेच बीजेडी शक्यतो केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेते, मात्र भाजपानेच राज्यातील सत्ता घालवली, त्यामुळे साथ देणं परवडणारं नाही आणि केंद्रातील मोदी सरकारशी पंगा नको असावा, त्यामुळे नवीन पटनायकांनी एनडीए आणि इंडियापासून सारखंच अंतर राखलं. २०२२मध्ये पटनायकांनी धनखड यांना मतं दिली होती.
तेलंगणा – भारत राष्ट्र समिति (BRS)
राज्यसभा- ४ खासदार
लोकसभा – ०
केसीआर यांनी तटस्थ राहण्याचं कारण देताना शेतकरी समस्यांचा मुद्दा मांडला. शेतीसाठी युरियाचा तुटवडा भरुन काढण्यात काँग्रेस , भाजप अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. पण हे अधिकृत कारण झालं. प्रत्यक्षात आणखी एक कारण इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे तेलुगु आहेत. भाजपाविरोधात जाणं परवडणारं नव्हतं. पण तेलंगणा हे तेलुगूभाषिक राज्य आहे. तेलुगु बिड्डाच्याविरोधात मत दिलं, तर तेलुगू मतदारांना आवडणारं नव्हतं. त्यात केसीआर यांचीच लेक बंडाचा झेंडा घेत आक्रमक झाली असताना तर खूपच काळजी वाटणं स्वाभाविक होतं. तसंच इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस तेलंगणात बीआरएसचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. काँग्रेसनेच बीआरएसची सत्ताही घालवली. त्यामुळे इंडियाला साथ देणं शक्य नव्हतं.
पंजाब- शिरोमणि अकाली दल (SAD)
लोकसभा – १ खासदार
(कारण – पंजाबमधल्या पूरस्थितीवरुन)
पंजाबात सध्या सत्तेत असणारा आप आणि विरोधात असणारा काँग्रेस हेच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रतिस्पर्धी. दोघेही इंडिया आघाडीचे या निवडणुकीत भाग होता. भाजपा पूर्वी अकाली दलाचा युतीमित्र, पण आता नाही. तिघांपासून दूर राहत पंजाबी मतदारांना संकटात सोबत आहोत दाखवण्यासाठी पूर परिस्थितीचं अधिकृत कारण दिलं गेल्याची शक्यता असावी.
अपक्ष – १ – पंजाबातील एक अपक्ष खासदार सरबजीत सिंग खालसा यांनीही मतदान केले नाही.
मतदानास गैरहजर ‘ते’ १४ खासदार कोण?
बिजू जनता दल (ओडिशा)
- सस्मित पात्रा
- मुन्ना खान
- निरंजन बिशी
- मानस रंजन मंगराज
- सुलता देव
- देबाशिष समंतराय
- सुभाषीष खुंटिया
भारत राष्ट्र समिती (तेलंगणा) - केआर सुरेश रेड्डी
- रविचंद्र वधिराजू
- दामोदरराव दिवकोंडा
- बी पार्थसारधी रेड्डी
शिरोमणी अकाली दल (पंजाब) - हरसिमरत कौर
अपक्ष (पंजाब) - सरबजीत सिंग खालसा
- अमृतपाल सिंग
नवे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन दक्षिणेतील भाजपाचे ज्येष्ठ शिलेदार!
- सी पी राधाकृष्णन हे भाजपाचे दक्षिणेतील ज्येष्ठ नेते होते.
- त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत भाजपाच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे.
- तामिळनाडूमधील कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते.
- सी पी राधाकृष्णन यांनी दक्षिण भारतात भाजपाचा प्रवेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
- आताही त्यांच्या उमेदवारीमागे कर्नाटकाशिवाय अन्य राज्यांमध्ये शक्य न झालेला दक्षिणविजयाचा प्रयोग यशस्वी करण्याचं लक्ष्य सांगितलं जातं.
- ते १९९८ आणि १९९९ अशा दोन निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले होते.
- त्यानंतर २००४, २०१४ आणि २०१९मध्ये त्यांचा तीन वेळा पराभव झाला.
- त्यानंतर फेब्रुवारी २०२३मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडच्या राज्यपालपदी झाली होती.
- राधाकृष्णन जुलै २०२४मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल झाले.
- ९ ऑगस्ट २०२५ रोजी ते उपराष्ट्रपतिपदी निवडून आले.
नवे उपराष्ट्रपती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील!
- चंद्रपुरम पोनुसामी म्हणजेच सी पी राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुप्पुरमध्ये झाला.
- त्यांचं शिक्षण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवीधर आहेत.
- सीपी राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.
- भारतीय जनसंघापासून ते राजकारणात सक्रिय आहेत.
- त्यांची नियुक्ती तामिळनाडू भाजपाच्या सचिवपदी १९९६मध्ये करण्यात आली.
- ते १९९८, १९९९मध्ये कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.
- सी पी राधाकृष्णन यांनी २००४मध्ये संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण केलं.
- दक्षिणेतील पक्षविस्ताराचा भाग म्हणून राधाकृष्णन भाजपाचे केरळमधील प्रभारी होते.