Home / देश-विदेश / Nepal Protest: नेपाळमध्ये तरूणाईच्या हिंसाचाराचा भडका! सत्ता पालटली, पंतप्रधान पळाले; संसद ते कोर्ट जाळपोळ

Nepal Protest: नेपाळमध्ये तरूणाईच्या हिंसाचाराचा भडका! सत्ता पालटली, पंतप्रधान पळाले; संसद ते कोर्ट जाळपोळ

Nepal Protest: सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये काल पेटलेले तरुणांचे आंदोलन आज दुसऱ्या दिवशी मोठ्या आगडोंबात रुपांतरित झाले. त्यातून नेपाळमध्ये दिवसभर...

By: Team Navakal
Nepal Protest

Nepal Protest: सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये काल पेटलेले तरुणांचे आंदोलन आज दुसऱ्या दिवशी मोठ्या आगडोंबात रुपांतरित झाले. त्यातून नेपाळमध्ये दिवसभर जाळपोळ, तोडफोड आणि हिंसक घटनांचे सत्र सुरू राहिले. संतप्त आंदोलकांनी संसद,
सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानांसह अनेक इमारतींना आग लावली.

सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लष्कराच्या विमानाने ते अज्ञातस्थळी पळून गेले. सायंकाळी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला. मात्र, तरुणांचा संताप इतका अनावर होता की, त्यांनी अनेक मंत्र्यांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारले.

आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाख खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना जिवंत जाळले. त्यांचा संध्याकाळी मृत्यू झाला. या हिंसाचारामुळे नेपाळमध्ये अराजकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून, 400 हून अधिक जण जखमी झाले. नवे पंतप्रधानपद म्हणून राजधानी काठमांडूचे महापौर बालेश शाह यांचे नाव चर्चेत आहे.

आज सकाळी आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव, क्रीडामंत्री तेजुलाल चौधरी या चार मंत्र्यांनी राजीनामा दिला. काल रात्री गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला होता. कालपासून नेपाळच्या एकूण पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आज सरकारने सोशल मीडियावरील बंदीही उठवली. मात्र आज पुन्हा आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी मंत्र्यांची घरे आणि सरकारी इमारतींना एकेक करून टार्गेट करायला सुरुवात केली. त्यांनी आज पुन्हा संसद भवनावर चाल केली. या इमारतीत जाळपोळ केल्यावर त्यांनी आपला मोर्चा

सर्वोच्च न्यायालय इमारतीकडे वळवला. ही इमारतही पेटवून देण्यात आली. काही आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला आग लावली. त्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या खासगी निवासस्थानी पोहोचून तिथेही जाळपोळ, तोडफोड केली. सोशल मीडियावर बंदीचा निर्णय लादणाऱ्या गृहमंत्र्यांचे घरही त्यांनी पेटवले. माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांचे घरही जाळण्यात आले. सत्ताधारी नेपाळी काँग्रेसच्या मुख्यालयालाही आग लावली. नेपाळी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयावरही आंदोलकांनी हल्ला केला.

सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देणारे माजी पंतप्रधान शेरशहा देऊबा यांना घरात शिरून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत देऊबा रक्तबंबाळ झाले. आंदोलकांनी त्यांच्या पत्नीलाही सोडले नाही. अर्थमंत्री विष्णु पोडौल यांनाही पळवून-पळवून मारण्यात आले. तर ऊर्जामंत्र्यांच्या घरात सापडलेल्या नोटा हवेत फेकून आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला. या हल्ल्यांमुळे सुरक्षा दलांनी महत्त्वाच्या नेत्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली.

आंदोलकांनी नॅशनल इंडिपेंडेंट पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नक्खू येथील तुरुंगातून सुटका केली. आंदोलकांना पाठिंबा देत रवी लामिछानेसह 20 आरएसपी खासदारांनी सामूहिक राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी आजही सुरक्षा दलांनी गोळीबार केला. पण आंदोलक कुणालाही जुमानत नव्हते.

नेपाळमधील या आंदोलनामागे नेपाळी राजघराण्याचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. आज नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांनी कालच्या गोळीबाराचा निषेध करत त्यांनी निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, काठमांडू आणि देशातील इतर बहुतेक प्रमुख शहरांमध्ये आंदोलकांद्वारे देश आणि समाजासाठी काही चांगले काम करण्याच्या उद्देशाने पुढे आलेल्या आशावादी किशोरवयीन तरुण-तरुणी तसेच पुरुष आणि महिलांनी व्यक्त केलेला राग निश्चितच आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. तरुण पिढीच्या मागण्या न्याय्य असाव्यात. जीव घेणे आणि शेकडो लोकांना जखमी करणे हे अत्यंत दुःखद आणि निंदनीय कृत्य आहे. पुढील पिढीचे हे आंदोलन हिंसक, अराजक असू नये आणि त्यात कोणाचीही घुसखोरी होऊ नये. देशांतर्गत तोडगा काढण्याचे आवाहन मी करतो.

दरम्यान, नेपाळच्या सुरक्षा संस्थांचे प्रमुख, मुख्य सचिव, गृह सचिव यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान ओलींचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, राजकीय संवादाद्वारे लवकरात लवकर शांततापूर्ण तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज काठमांडू विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शहरातील धुमसणारी परिस्थिती आणि उड्डाण तसेच लँडिंग मार्गावर दिसणारे धुरांचे लोट यामुळे हा निर्णय घेण्यात आला. देशांतर्गत उड्डाणे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत.

नेपाळमध्ये गेल्या 17 वर्षांत 15 सत्ता कोसळल्या. 2008 पासून देशात प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. वर्ष-दीड वर्षातच पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागते. ओली यांची राजवटही 14 महिनेच टिकली. आंदोलकांकडून काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना पंतप्रधान करण्याची मागणी समोर येत आहे. शाह यांनी हे आंदोलन पूर्णतः जेन झीचे आहे. जेन-झी तुमच्या खुन्याने राजीनामा दिला आहे. आता नव्या पिढीला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. आता संयम बाळगा. देशाच्या जनसंपत्तीचे नुकसान म्हणजे तुमच्याच मालमत्तेचे नुकसान आहे. देशाची सुत्रे हाती घेण्यासाठी सज्ज राहा.

बालेन यांनी सैन्य प्रमुखांनाही चर्चेचे आवाहन केला आहे. चर्चेआधी विद्यमान संसद बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, माजी पंतप्रधान डॉ. बाबूराम भट्टाराई यांनी आंदोलक युवकांचा सहभाग असलेले हंगामी सरकार बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून भारताने बिहारला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमेवर गस्त घालत आहेत.

रॅप स्टार बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान होणार?

जेन – झी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने लोकप्रिय झालेले काठमांडूचे 35 वर्षांचे युवा महापौर बालेन शाह यांना नेपाळचे पंतप्रधान करण्याची मागणी होत आहे. बालेन शाह हे नेपाळचे स्टार रॅप गायकही आहेत.

बालेन शाह सध्या नेपाळच्या काठमांडू महानगरपालिकेचे महापौर आहेत. त्यांनी 2022 मधील स्थानिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. ते सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांनी भारतातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून पदवी मिळवली. टाईम मॅगझिनच्या 2023 च्या टाईम 100 नेक्स्ट यादीत राजकारणी म्हणून त्यांचा समावेश केला होता. न्यूयॉर्क टाईम्सनेही त्यांच्या कार्यावर विशेष वृत्तांत प्रसिद्ध केला आहे.

श्रीलंका-बांगलादेशनंतर आता नेपाळमध्ये हिंसा

नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची तुलना 2022 मध्ये श्रीलंकेत आणि 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या आंदोलनाशी केली जात आहे. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये तरुणाईने म्हणजे जेन झी पिढीनेच (1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी) बंडाचे नेतृत्व करून सत्ता उलथवली होती.

श्रीलंकेत इंधन आणि अन्नपदार्थांच्या वाढत्या तुटवड्यामुळे तरुण पिढी रस्त्यावर उतरली. सुरुवातीला शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नंतर आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट राष्ट्रपती भवनच ताब्यात घेतले. त्यानंतर अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनानंतर श्रीलंकेत नवे सरकार स्थापन झाले.

बांगलादेशात विद्यार्थ्यांनी तत्कालीन सरकारी नोकरीतील कोटा धोरणाविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू केली. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पेटत गेले. विद्यार्थ्यांनी देशभर तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. अनेक दिवस चाललेल्या या आंदोलनात 300 हून अधिक जणांचा बळी गेला. अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी पोलीस आणि लष्कराला न जुमानता पंतप्रधान निवासस्थानाला वेढा घातला. तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडून पळ काढला आणि भारतात आश्रय घेतला. अजूनही त्या भारतातच आहेत.

त्यांच्या 16 वर्षांच्या सत्तेचा अंत झाला. हसीना यांनी देश सोडताच आंदोलक त्यांच्या अधिकृत निवासस्थानी घुसले. त्यांनी तिथले कपडे, फर्निचर, झुंबरे, भांड्यांसह सर्व साहित्य पळवले. आंदोलकांच्या लुटीचे, आंदोलक तिथल्या स्विमिंग पूलमध्ये डुबत असल्याचे, डायनिंग टेबलवर बसून जेवत असल्याचे, पलंगावर झोपल्याचे व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

या आंदोलनानंतर बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते मायक्रो बँकिंगचे पुरस्कर्ते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. आता बांगलादेशात सार्वजनिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू झाली आहे. नेपाळच्या तरुणांच्या आंदोलनानंतर आता या भारतीय उपखंडातील या तिसऱ्या देशातही सत्तांतर होताना दिसत आहे.


हे देखील वाचा – उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक भाजपा एनडीएनंच जिंकली, पण धनखडांवेळचं मताधिक्य घटलं!

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या

Share:

More Posts