Uddhav Thackeray Raj Thackeray Meeting: शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी आज भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे येत्या दसरा मेळाव्यात उबाठा व मनसेच्या युतीची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम किंवा काहीही राजकारण नव्हते. गणपतीच्या वेळी उद्धव ठाकरे जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेले तेव्हा राज ठाकरेंच्या आईंनी त्यांना सांगितले की, गर्दी असल्याने आपल्याला बोलायला मिळाले नाही त्यामुळे तू पुन्हा मला भेटायला ये आणि त्यानुसार उद्धवजी कुंदा मावशींना (राज ठाकरेंच्या आई) भेटायला आले होते. दरम्यान, संजय राऊत यांनी दसऱ्या मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उत्तर देणे टाळले. मात्र जर कौटुंबिक भेट होती तर संजय राऊत का गेले होते? हा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे हिंदीसक्तीविरोधी मुद्यावर एकत्र आल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 जुलै रोजी हिंदीसक्तीविरोधी मेळाव्यात दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर आले. त्यानंतर 27 जुलैला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 27 ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यादेखील शिवतीर्थवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भोजनचा आस्वादही घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आणि दोघांमध्ये तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीवेळी उबाठाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब उपस्थित होते. मनसेचे बाळा नांदगावकरही उपस्थित असल्याची चर्चा आहे. याआधी दोघांच्या कौटुंबिक भेटी झाल्या होत्या, परंतु ही त्यांची पहिली राजकीय बैठक होती. उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे बंधूंची आजची भेट पूर्वनियोजित असल्याचाही दावा केला जात आहे.
या भेटीत आगामी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह प्रमुख महापालिका निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीचे महत्त्व असे की, ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांतील निवडणुकीचे समीकरण बदलू शकते. दोन्ही पक्षांची ताकद लक्षात घेता ही युती भाजप-शिंदे गटासाठी आव्हानात्मक ठरू शकते. विशेष म्हणजे, येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात या युतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या एकत्रित उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण होऊ शकते. दरम्यान, शिवाजी पार्कवर उबाठाच्या मेळाव्याला पालिकेने परवानगी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर भेट देऊन मनसेला आघाडीत घेण्याबाबत चर्चा केली होती, मात्र त्यांनी सावध भूमिका घेतली होती. दिल्लीतील हायकमांडशी चर्चा करूनच भूमिका स्पष्ट करू, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. जर मनसेसोबत युती झाली आणि काँग्रेसने ही युती मान्य केली नाही तर महाविकास आघाडीत मतभेद होऊ शकतात. राज ठाकरे यांच्या भूमिका आग्रही हिंदुत्व, परप्रांतीय विरोधी आणि मराठी माणसांच्या प्रश्नांवर आक्रमक अशी आहे . महाविकास आघाडीच्या विचारसरणीशी ही विसंगत असल्याने ही युती कितपत टिकेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीने या युतीला विरोध केला, तर उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार की आघाडीत कायम राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, अशा अनेक बैठका बघायला मिळतील. उबाठा नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, सत्ताधारी हे महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरत आहेत. आता दोन बंधू जर या सगळ्याला तोंड देण्यासाठी एकत्र येत असतील तर त्यात काय चुकीचे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, समविचारी पक्षांसोबत जाण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. अधिकृतरित्या आमच्यामध्ये बैठक सुरू आहेत. भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ठाकरे आणि मनसे यांची युती झाली तरी महायुतीला फारसा फरक पडणार नाही. भाजप नेते मुनगंटीवार म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र आल्यास काही होणार नाही.
मनसे नेत्यांची आज बैठक
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या मनसेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी दहा वाजता त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी होणार आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही बैठक मनसेच्या नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आजच्या चर्चेनंतर केवळ मनसेच्या नेत्यांची उपस्थिती असलेली ही बैठक, आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – Abhishek Bachchan : ऐश्वर्यानंतर अभिषेक बच्चनही कोर्टात नाव व फोटो वापरावर बंदीची मागणी