2020 Delhi riots case: जेएनयूमधील माजी विद्यार्थी उमर खालीद (Umar Khalid) ने जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणात ( 2020 Delhi riots case) खालीदसह इतर आठ जणांविरोधात यूएपीए अंतर्गत व्यापक कट रचल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणात गेल्या २ सप्टेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
प्रस्तावित नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत दंगल उसळली होती. या दंगलीत ५३ जणांचा जीव गेला, तर शेकडो जण जखमी झाले. या प्रकरणात आरोपींवर अनेक दंगली घडवून आणण्याचा व्यापक कट होता, असा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपींवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जामिनासाठी वेगवेगळ्या न्यायालयात अर्ज दाखल करावे लागले आहेत. यापैकी अनेक आरोपी हे कोणत्याही जामिनाविना २०२० पासून तुरुंगाची हवा खात आहेत.
उमर खालीद सप्टेंबर २०२० पासून तुरुंगात असून त्याने आतापर्यंत जामिनासाठी दोनवेळा हायकोर्टात अर्ज केला आहे. तत्पूर्वी, मार्च २०२२ मध्ये सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगत उच्च न्यायालयाने जामीन नाकारला.
मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. यानंतर १४ वेळा या प्रकरणाच्या सुनावणीला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याने परिस्थिती बदलल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयातील आपली याचिका मागे घेतली. यानंतर सत्र न्यायालयाने २८ मे रोजी उमर खालिदचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नाकारला होता. सत्र न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानेही २ सप्टेंबर रोजी फेटाळली.
खटल्याला प्रलंबित राहिल्यामुळे उमर खालिद ५ वर्षांपासून दोषी न ठरता तुरुंगात आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. यावर उच्च न्यायालयाने म्हटले, की दिल्ली पोलिसांनी ३,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे आणि त्यात अतिरिक्त ३०,००० पानांचे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. पोलिसांनी सविस्तर तपास केला आहे, त्यामुळे अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खटल्याची सुनावणी नैसर्गिक गतीने पुढे जाईल. त्यामुळे या प्रकरणातील खटला घाईघाईने चालवणे आरोपी आणि सरकार दोघांसाठीही धोक्याचे ठरेल, असे म्हणत जामीन अर्ज फेटाळला.
हे देखील वाचा –
शाहरुख-दीपिकाला कोर्टात दिलासा ह्युंदाई कारप्रकरणी चौकशी स्थगित
‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
चार्ली कर्क यांची अमेरिकेत हत्या, पण धक्का ट्रम्प यांना; असं का?