Bengaluru Metro Station Name Controversy: कर्नाटक मधील एका मेट्रो स्टेशनच्या नामांतरावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. बेंगळुरू येथील आगामी मेट्रोच्या शिवाजीनगर स्टेशनचे नाव बदलून ‘सेंट मेरी’ ठेवण्याचा प्रस्ताव कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे.
मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा नेते मनोज जरांगे यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यामुळे एका मेट्रो स्टेशनच्या नावावरून आता थेट दोन राज्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
वाद नेमका कशामुळे सुरू झाला?
बेंगळूर येथील सेंट मेरी बॅसिलिका मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी ठेवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. त्यांनी हे नाव बदलण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली जाईल, असेही म्हटले. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतर तातडीने महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
मनोज जरांगे यांनी एक पत्र लिहून सिद्धरामय्यांच्या या भूमिकेचा निषेध केला आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनीही नाव बदलण्याच्या प्रयत्नांवर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता ही बाब फक्त स्थानिक न राहता दोन राज्यांच्या राजकारणाचा भाग बनली आहे.
स्थानिक नेत्यांचा पाठिंबा, पण सोशल मीडियावर विरोध
शिवाजीनगर येथील आमदार रिझवान अर्शद यांनी या नामकरणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी “शिवाजीनगर सेंट मेरी” असे नाव देण्याचा औपचारिक प्रस्ताव दिला आहे. रिझवान अर्शद यांच्या मते, यामुळे परिसरातील महत्त्वाच्या स्थळाला सन्मान मिळेल आणि प्रवाशांचा गोंधळही होणार नाही.
परंतु, सोशल मीडियावर हा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. अनेकजण शिवाजीनगर स्टेशनला कन्नड अभिनेते शंकर नाग यांचे नाव देण्याची मागणी करत आहेत. शंकर नाग यांनी 1980 च्या दशकातच बेंगळुरू शहरासाठी मेट्रोची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांचे नाव देणे योग्य राहील, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, ही मेट्रो लाईन अद्याप सुरू झालेली नाही. तसेच, या मेट्रो प्रकल्पात केंद्र सरकारची भागीदारी असल्यामुळे कोणत्याही नावावर अंतिम शिक्कामोर्तब केंद्र सरकारच करणार आहे. मात्र, या मुद्यावरून महाराष्ट्रात देखील राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा –
‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती