IND vs PAK Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचलेली असते. पण आगामी आशिया कप 2025 मधील या बहुप्रतिक्षित सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये फारशी उत्सुकता पाहायला मिळत नाहीये.
या सामन्याची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होऊन 10 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला, तरी ती अजूनही शिल्लक आहेत. दुबईच्या स्टेडियममधील 50% तिकिटे विकली गेलेली नाहीत.
तिकिटांच्या विक्रीचा वेग इतका कमी का?
14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. साधारणपणे, भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच संपतात. यापूर्वी 2023 मध्ये दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याची तिकिटे तर अवघ्या 4 मिनिटांत विकली गेली होती. मात्र, आतापर्यंत 99 USD पासून सुरू होणाऱ्या किमतीची तिकिटेही शिल्लक आहेत. प्रीमियम तिकिटांची किंमत 4,534 USD म्हणजेच सुमारे 4 लाख रुपये आहे.
बहिष्काराची हाक आणि राजकारण
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी पाकिस्तानसोबतच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या राजकीय भूमिकेचा परिणाम थेट तिकिटांच्या विक्रीवर झाल्याचे दिसते.
बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे की, ते केंद्र सरकारच्या धोरणांचे पालन करतात. त्यामुळे पाकिस्तानसोबत केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच खेळले जाईल, द्विपक्षीय मालिका होणार नाहीत.
मैदानात मात्र उत्साह कायम
या सर्व वादामुळे खेळाडूंच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आमचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे.’ तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा म्हणाला, ‘आम्ही नैसर्गिक शैलीत खेळू. आमच्या खेळाडूंना आक्रमक राहायचे असेल, तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्याकडून कोणत्याही खेळाडूला वेगळी सूचना नाही.’
दरम्यान, भारताने आपला पहिला आशिया कप सामना UAE विरुद्ध जिंकला आहे. भारत आणि पाकमधील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 3 वेळा सामना होऊ शकतो.
हे देखील वाचा –
Women’s World Cup 2025: महिला विश्वचषकात नवा इतिहास; ICC ने घेतला ‘हा’ खास निर्णय
चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू