2006 Mumbai bomb blast – २००६ च्या मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांमधील साखळी बॉम्बस्फोट (Mumbai bomb blast) प्रकरणातील निर्दोष सुटलेल्या आरोपीने आता विनाकारण तुरुंगवास घडवल्याबद्दल तसेच कोठडीत पोलिसांकडून छळ झाल्याबद्दल राज्य सरकार (State Government) कडे ९ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे १८० जणांचा बळी गेला होता.या खटल्यातील एक आरोपी अब्दुल वाहीद शेख याला विशेष न्यायालयाने २०१५ मध्ये दोषमुक्त केले. उर्वरित सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने यावर्षी जुलै महिन्यात ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. अब्दुल वाहीद शेख याने राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तसेच राज्य मानवी हक्क आयोगाकडे शुक्रवारी अर्ज दाखल केला असून आपल्या पुनर्वसनासाठी ९ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (STA) मला विनाकारण अटक करून नऊ वर्षे तुरुंगात डांबले.त्यामुळे माझे संपूर्ण करियर, शिक्षण आणि वैयक्तिक जीवन पूर्णपणे उध्वस्त झाले.त्याचबरोबर कोठडीत पोलिसांनी केलेल्या अनन्वित छळामुळे प्रकृतीसंबंधी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.एवढेच नव्हे तर एटीएसने आपल्यावर दहशतवादी असा शिक्का मारल्याने ९ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मला कोणीही नोकरीवर ठेवण्यास तयार नाही.त्यामुळे माझ्या कुटुंबाला सामाजिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.औषधोपचार आणि जगण्यासाठीचा खर्च करणे कठीण होऊन बसल्याने माझ्या डोक्यावर ३० लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे.माझे सहआरोपी निर्दोष सुटेपर्यंत मी दहा वर्षे वाट पाहिली.आता ते सर्व निर्दोष सुटल्यानंतर मी नुकसानभरपाईची मागणी करत आहे,असे शेख याने पत्रात म्हटले आहे.
हे देखील वाचा –
एकनाथ शिंदे-फडणवीसांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांंवरून वाद
मोदींच्या मातोश्रींवरील व्हिडिओ; भाजपाचे काँग्रेसविरोधात आंदोलन