वेदिका मांगेल – सध्याच्या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियावर रोज नवनवे ट्रेंड्स येत असतात. कालपर्यंत लोकप्रिय असलेले काहीतरी आज क्षणात गडप होते आणि एखादे नवे वेड सर्वांना भुरळ घालू लागते. असाच चर्चेत असलेला आणि लहान मुलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला नवा ट्रेंड म्हणजे इटालियन ब्रेनरॉट कॅरेक्टर.
इटालियन ब्रेनरॉट कॅरेक्टर हे नाव ऐकल्यावर सुरुवातीला थोडा गोंधळ उडेल. पण या ट्रेंडची खरी मजा आगळ्या-वेगळ्या पात्रांमध्ये आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार झालेले या पात्रांचे जग अजबगजब, मजेशीर आणि प्रचंड मनोरंजक आहे. ही पात्रे प्रामुख्याने जेन झी आणि जेन अल्फा या तरुण पिढ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. लहान मुलांपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत सर्व जण या पात्रांची वेगवेगळी नावे उच्चारत, त्यांचे व्हिडिओ पाहत आणि शेअर करत धमाल करताना दिसतात. त्यामुळे हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
इटालियन ब्रेनरॉटच्या प्रत्येक पात्राची रचना इतकी विचित्र आणि मजेदार आहे की पाहणाऱ्याला हसू आवरत नाही. उदाहरणार्थ, नाइकी स्नीकर्स घालून धावणारा शार्क त्रालालेरो त्रालाला, कॉफीच्या कपाचे डोके असलेली बॅलरिना कॅप्युचिना, सुरीसारखे हात असलेला कॅप्युचिना असासिनो, विमान आणि मगर यांचे मिश्रण असलेला बॉम्बार्डिनो क्रोकोडिलो किंवा केळ्याच्या सालीत लपलेला चिंपान्झिनी बनानिनी ही नावे उच्चरतानाच जीभेची चांगलीच कसरत होते. पण लहानगे रोजच्या बोलण्यातही या नावांचा वापर करतात. शाळेत जर कुणी मोठ्याने तुंग तुंग तुंग साहूर! असे ओरडले, तर संपूर्ण वर्गात हशा पिकतो. मित्राला चिडवताना एखादा मुलगा अरे चिंपान्झिनी बनानिनी! असे म्हणतो आणि क्षणातच वातावरण हलके होते. याबाबत अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
यूट्यूब, टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर या पात्रांवर आधारित हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यात ब्रेनरॉट रॅप नावाचा व्हिडीओ तर कोट्यवधी वेळा पाहिला आहे. काही व्हिडीओ इतके लोकप्रिय झाले आहेत की त्यांच्या आधारे खेळणी, स्टिकर, टी-शर्ट सुद्धा बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
इटालियन ब्रेनरॉट मुलांमध्ये लोकप्रिय झाली असतानाच काही तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्पांनी म्लहटले आहे की, पालकांनी सावध राहून मुले काय पाहतात, काय ऐकतात यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण इंटरनेटवरची ही निरर्थक मजा मुलांसाठी आनंददायी असली तरी, योग्य नियंत्रणाशिवाय त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. अशा प्रकारच्या ओव्हरस्टिम्युलेटिंग (अतिरिक्त उत्तेजित करणाऱ्या) व्हिडीओंमुळे मुलांचे लक्ष कमी वेळ टिकते आणि त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
ब्रेनरॉट कॅरेक्टर म्हणजे काय ?
ब्रेनरॉट कॅरेक्टर ही एआय निर्मित डिजिटल आविष्कार आहेत. ही पात्र, प्राणी, वस्तू चित्र-विचित्र आकार आणि रूप असलेली आहेत. त्यांना तेवढीच विचित्र नावे आहेत. त्यांचा उद्देशकेवळ मनोरंजन करणे हा आहे. खरे तर ब्रेन रॉट हा कल्पना खूप जुनी आहे. २००७ मध्ये अशीच ब्रेनरॉट कॅरेक्टर कॅरॅक्टर ट्विटरने ते गेमिंग शोसाठी वापरले होते. आता एआयच्या करामतीमुळे ते भन्नाट रुपात आले आहेत. मात्र, त्यांना इटालियन ब्रेनरॉट कॅरेक्टर म्हटले जात असले तरी यातील सगळी नावे इटालियन नाहीत, तर टुंग टुंग साहूर हे इंडोनेशियन आहे.
Tralalero Tralalá

Tung Tung Tung Sahur

Bombardiro Crocodile

Chimpanzini Bananini
