Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai municipal election 2025) पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
‘बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’, असं म्हणत फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत महायुतीच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
‘ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’: फडणवीस यांची घणाघाती टीका
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरं म्हणजे काही लोक आपलं हसू करून घेतात. साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं की कशाला पक्षावर लढायचं? मात्र, काहीजण म्हणाले की आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. पण आमच्या शंशाक राव, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी बेस्टच्या निवडणुकीत या ब्रँडचा बँड वाजवला.”
फडणवीस पुढे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, पण तुम्ही ब्रँड नाही. फक्त नाव लावल्याने कोणीही ब्रँड बनत नाही. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड म्हणून जगात एस्टॅब्लिश होतो, अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे, त्या ब्रँडचं नाव नरेंद्र मोदी असं आहे.
मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणारच
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, आता काहीही झाले तरी मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळी थोडक्याने वाचलो होतो, दोनच नगरसेवक कमी पडले होते. कमी पडल्यावर काय करायचे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कोणी बरोबर आलं तरी किंवा कोणी बरोबर नाही आलं तरी, मुंबईत महायुतीचाच महापौर होईल. यावेळी मुंबईत महायुतीचा महापौर केल्याशिवाय भाजपचा एकही कार्यकर्ता राहणार नाही.
2019 च्या ‘गद्दारी’ची आठवण करून दिली
फडणवीस यांनी 2019 च्या निवडणुकीत घडलेल्या प्रकाराची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “मागच्या वेळी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी उद्धवजी यांची इच्छा होती. आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. आपण एक पाऊल मागे घेऊन त्यांना महापौरपद दिले. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष सगळे तुम्ही घ्या, आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही असं सांगितलं.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही. 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखविला आणि 2024 ला आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आणले.”
हे देखील वाचा – Cabinet 8 Decisions : राज्य मंत्रिमंडळाचे शिक्षण, उद्योग, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसाठी 8 महत्त्वाचे निर्णय