Swiggy Toing App: तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा नोकरीनिमित्त इतर शहरात राहत असाल आणि कमी बजेटमध्ये रोज जेवणाची ऑर्डर देत असाल तर तुमच्यासाठी एक खास ॲप आले आहे. फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने ‘Toing’ नावाचे एक नवीन आणि स्वतंत्र ॲप लॉन्च केले आहे.
हे ॲप खास करून कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आले असून, यात 100 ते 150 रुपयांच्या रेंजमधील जेवण उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, Swiggy ने नेहमीप्रमाणे बंगळुरूऐवजी पुण्याला या ॲपच्या लॉन्चिंगसाठी पहिले शहर म्हणून निवडले आहे. म्हणजेच, पुणेकरांसाठी स्विगीने स्वस्तात चांगले जेवण उपलब्ध करून देणारे ॲप सुरू केला आहे. नंतर इतर शहरांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध केली जाईल.
कमी बजेट असलेल्यांसाठी खास सुविधा
‘Toing’ ॲप Swiggy च्या मुख्य ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या ॲपवर फक्त कमी किमतीचे आणि रोजच्या जेवणाचे पर्याय उपलब्ध असतील. Swiggy ने याआधी ‘रुपये 99 स्टोर’ सुरू केले होते, त्याला मिळालेल्या यशानंतर ‘Toing’ च्या माध्यमातून कमी किमतीतील जेवणाचे पर्याय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲपवरील काही वस्तूंची किंमत 99 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे.
पुण्यातच लॉन्च का?
सामान्यतः Swiggy आपल्या नवीन सेवांची सुरुवात बंगळूरूमधून करते, पण ‘Toing’ साठी पुण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे मुख्य कारण पुण्यातील मोठी विद्यार्थी संख्या आणि तरुण व्यावसायिक वर्ग आहे.
कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी पुण्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीला हे ॲप पुण्यातील 4 ते 5 भागात कार्यरत राहील आणि प्रतिसाद पाहून त्याचा विस्तार केला जाईल.
‘Toing’ ॲपचा लॉन्च Rapido च्या ‘Ownly’ फूड डिलिव्हरी सेवेला थेट स्पर्धा देणारे मानले जात आहे, कारण ‘Ownly’ रेस्टॉरंट्सकडून फक्त 25 रुपये कमिशन घेते. Swiggy ने ‘सुपर ॲप’ मॉडेलपासून दूर जात आता वेगवेगळ्या सेवांसाठी स्वतंत्र ॲप लॉन्च करण्याची रणनीती स्वीकारली आहे.
‘Toing’ हे कंपनीचे सातवे स्वतंत्र ॲप आहे. यापूर्वी Snacc, Instamart, Pyng, Crew आणि Dineout सारखे ॲप्स लॉन्च करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा – ‘तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद