India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान संघ आशिया कप 2025 स्पर्धेत पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ सुपर-4 मध्ये एकमेकांशी भिडतील.
पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधील आपल्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) वर 41 धावांनी विजय मिळवला. या विजयासह, पाकिस्तानने सुपर-4 स्टेजसाठी क्वालिफाय केले आहे. या निकालामुळे यजमान UAE चा प्रवास या स्पर्धेतून संपुष्टात आला आहे.
आता ग्रुप-ए मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सुपर-4 मध्ये पोहोचले आहेत, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना होणार आहे. हा दुसरा मुकाबला आता 21 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल.
भारत-पाकिस्तान यांच्यातील दुसरा ‘महामुकाबला’
भारताने आपले दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून आधीच सुपर-4 साठी क्वालिफाय केले होते. ओमानचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. त्यामुळे सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि UAE यांच्यात थेट लढत होती, ज्यामध्ये पाकिस्तानने बाजी मारली. त्यामुळे ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान सुपर-4 मध्ये पोहोचले आहेत.
आधीच्या सामन्यातील ‘हँडशेक’वरून वाद
याआधी झालेल्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवले होते. परंतु, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या घटनेवर नाराजी व्यक्त करत आयसीसीकडे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे आता 21 सप्टेंबरला होणारा दोन्ही संघांमधील सामना महत्त्वाचा असणार आहे.
हे देखील वाचा – माणसाचा ‘मेंदू खाणारा अमिबा’ काय आहे? आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि बचावाचे उपाय