Home / News / Rahul Gandhi alleged voter fraud : महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मतदार यादीत घोटाळा संगणकाच्या मदतीने फेरफार! राहुल गांधींनी पुरावे दिले

Rahul Gandhi alleged voter fraud : महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मतदार यादीत घोटाळा संगणकाच्या मदतीने फेरफार! राहुल गांधींनी पुरावे दिले

Rahul Gandhi alleged voter fraud – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Ganadhi)यांनी आज पुन्हा एकदा मत घोटाळ्याचा पुराव्यानिशी आरोप करीत(Election...

By: Team Navakal
Rahul Gandhi alleged voter fraud

Rahul Gandhi alleged voter fraud – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Ganadhi)यांनी आज पुन्हा एकदा मत घोटाळ्याचा पुराव्यानिशी आरोप करीत(Election Commision) निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे या घोटाळ्याला साथ देत असल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा मतदारसंघात 6850 बोगस मतदार घुसविल्याचा आरोप केला (voter fraud)आणि कर्नाटकातील आळंद या मतदारसंघात 6018 मते वगळल्याचा आरोप केला. मतदार यादीतील घोटाळा हा पूर्णपणे संगणकाची मदत घेऊन नियोजितपणे केल्याचे त्यांनी म्हटले. हा प्रकार गेले 10 वर्षे सुरू होता, असा त्यांनी आरोप केला.

1 क्रमांकावरील मतदाराने एकावेळी 12, 14 अशी मते वगळली किंवा घुसवली, यासाठी वेगवेगळ्या राज्यातील फोन नंबरचा वापर केला. ज्यांची मते वगळली किंवा घुसवली त्यांना या प्रकाराची कोणतीही माहिती नाही. अनेक ठिकाणी पहाटे 4 वाजता उठून हे प्रकार करण्यात आले. यातील सर्व पुरावे दाखवून राहुल गांधी यांनी आज खळबळ उडवून दिली.महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा मतदारसंघात 6850 मतदार यादीत घुसविण्यात आले, असे राहुल गांधी यांनी आज सांगितले.

ज्यावेळी निवडणूक झाली होती त्यावेळी राजुराच्या निवासी रहिवाशांनी याबाबत तक्रार केली होती. ज्यांचा जन्म राजुरात झाला नाही अशी अनेक नावे मतदार यादीत दिसत आहेत, अशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर हे स्थानिक रहिवासी पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रार दिली. हे घडल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी यात लक्ष घातले आणि तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीने अद्यापही याबाबतचा अहवाल दिलेला नाही.

आज राहुल गांधी यांनी राजुराचा विषय मांडल्यानंतर काँग्रेसचे राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले की, राहुल गांधी यांनी राजुराबाबत माहिती काढल्यानंतर आम्हीही या घुसविलेल्या मतदारांचा कालपासून शोध घेण्यास सुरुवात केली. यातील बहुतांश सर्व मतदार हे बोगस आहेत हे आमच्या लक्षात आले. काही मतदारांची चौकशी बाकी असून, ती येत्या काही दिवसांत आम्ही पूर्ण करणार आहोत. यावर प्रतिक्रिया देताना राजुराचे भाजपाचे विद्यमान आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, काँग्रेसचा हा नेहमीचाच उद्योग आहे. ते हारले की आरोप करतात आणि जिंकले की शांत बसतात.राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेआधी काँग्रेसने सोशल मीडियावर तुमचे सीटबेल्ट बांधून घ्या, अशी पोस्ट केली होती. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आळंदमधील मतदारांची नावे कशी वगळण्यात आली, याचे तीन पुरावे सादर केले. राहुल गांधी यांनी गोदाबाई नावाच्या एका ज्येष्ठ महिलेचा व्हिडिओ दाखवला. या गोदाबाई यांच्या नावाने 11 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र गोदाबाई व्हिडिओमध्ये सांगतात की, मी कोणाचेही नाव वगळण्यासाठी अर्ज केला नाही. मी 11 जणांची नावे वगळली, याची मला काहीही कल्पना नाही.

राहुल गांधी यांनी दुसरा पुरावा म्हणून सूर्यकांत यांना सादर केले. या सूर्यकांत यांनी पहाटे चार वाजता, अवघ्या 36 मिनिटांत 12 अर्ज करून 14 मतदारांची नावे वगळली, असे कागदोपत्री दिसत आहे. सूर्यकांत यांना याबद्दल विचारले असता त्यांनीही आपल्याला याची काहीही कल्पना नाही. आपण कोणाची नावे वगळण्यासाठी अर्ज केलेला नाही, असे सांगितले. सूर्यकांत यांनी कथितरित्या वगळलेल्या बबिता चौधरी नावाच्या महिलेलाही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आणले.

नागराज नावाच्या अन्य एका व्यक्तीने पहाटे चार वाजता अवघ्या 36 सेकंदांत दोन अर्ज करून दोन मतदारांची नावे वगळल्याचे कागदोपत्री दिसते. ही मतचोरी 2018 आणि 2023 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान झाली. मात्र, ही चोरी 2023 मध्ये पकडली गेली असे राहुल गांधी म्हणाले.2023 च्या विधानसभा निवडणुकीत आळंदमधील एका बुथस्तरीय अधिकाऱ्याच्या काकाचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. त्या अधिकाऱ्याने चौकशी केली असता ज्या व्यक्तीने नाव वगळले होते ती व्यक्ती त्यांची शेजारी असल्याचे आढळले. अधिकाऱ्याने त्या शेजाऱ्याकडे विचारणा केली असता शेजाऱ्याने आपण कोणाचेही नाव वगळण्यासाठी अर्ज केला नाही, असे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्याने याची रितसर तक्रार केली.

या तक्रारीची चौकशी करणाऱ्या कर्नाटक सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला 18 महिन्यांत 18 पत्रे लिहिली. मात्र निवडणूक आयोगाने कर्नाटक सीआयडीला उत्तर दिले नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.आळंद मतदारसंघातील दहा बुथवर हजारो मतदारांची नावे वगळण्यात आली. त्या दहापैकी आठ बुथवर काँग्रेसची स्थिती मजबूत होती, असा आरोप करताना राहुल गांधी यांनी ज्या मोबाईल नंबरवरून ही नावे वगळण्यात आली त्यापैकी काही मोबाईल नंबर पत्रकार परिषदेत दाखवले. हे सर्व नंबर कर्नाटक राज्यातील नसून अन्य राज्यांमधील आहेत.

या मोबाईल नंबरवर कॉल केला, तर प्रतिसाद मिळत नाही. हे मोबाईल नंबर कोणाच्या नावे आहेत, त्यांचा आयपी ॲड्रेस, त्या नंबरवर पाठवण्यात आलेला ओटीपी आणि त्या व्यक्तीचा वास्तव्याचा पत्ता अशी माहिती आम्हाला द्या, अशी विनंती कर्नाटक सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वारंवार केली.

सीआयडीने शेवटचे पत्र सप्टेंबर 2024 मध्ये आयोगाला पाठवले. मात्र सीआयडीच्या एकाही पत्राला उत्तर न देता आयोगाने हे प्रकरणच बंद करून टाकले. राज्य निवडणूक आयोगानेही केंद्रीय आयोगला याबाबत स्पष्टीकरण करा, असे सांगितले. परंतु त्यालाही केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.राहुल गांधी म्हणाले की, हा मत घोटाळा एकट्या कर्नाटकमध्ये झाला नाही. तर हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही याच पध्दतीने मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यात आले. काही ठिकाणी नावे वगळण्यात आली, तर काही ठिकाणी वाढवण्यात आली.

कर्नाटकमधील उदाहरण दिलेल्या तिन्ही प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तीने अन्य मतदारांची नावे वगळली, त्या व्यक्तीचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर होते. याचा अर्थ कोणीतरी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर वापरून ही व्होटचोरी केली. पहिल्या क्रमांकावर जे नाव असेल ते वापरून त्याच्या लॉग इनवरून अन्य मतदारांची नावे वगळण्यात आली. नावे वगळणे किंवा जोडणे या दोन्ही गोष्टी एकाच ‌‘केंद्रीकृत‌’ यंत्रणेद्वारे केल्या जात आहेत, फक्त ठिकाणानुसार पद्धत बदलली जात आहे. नावांत ‌‘जे डब्ल्यू जे डब्ल्यू जे डब्ल्यू‌’ किंवा धणक णटगगथ आणि पत्त्यात डअडढख, डअडढख अशा निरर्थक आणि समान शब्दांचा वापर केला गेला आहे. हेच नमुने राजुरा आणि इतर ठिकाणच्या प्रकरणांमध्येही आढळले. त्यामुळे हे काम एकाच सॉफ्टवेअरद्वारे केले जात आहे, हे स्पष्ट होते.

निवडणुकीतील हेराफेरी जनतेसमोर आणण्याची सुरुवात केल्यापासून आपल्याला निवडणूक आयोगातील अधिकारीच गुपचूप माहिती पुरवू लागले आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. हे आता थांबणार नाही. भारतीय जनता आता ही व्होटचोरी खपवून घेणार नाही. लोकशाहीची हत्या कदापि सहन करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. आता एका आठवड्यात याबाबत स्पष्टीकरण नाही दिले तर तुम्ही भारतीय लोकशाहीचा खून पाडण्याच्या कटात भागीदार आहात हे सिध्द होईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी आयोगाला दिला.

राहुल गांधी यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत एकदाही भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आरोप केला नाही. मात्र त्यांचे बोट भाजपाकडेच असल्याने भाजपाच्या वतीने खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राहुल गांधी धमाका करायला आले आणि ड्रामा करून गेले. ऑनलाईन पद्धतीने कोणीही नागरिक कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळू शकत नाही. ज्याचे नाव वगळले जाणार असते त्याचे म्हणणे आयोग ऐकून घेतो आणि सर्व शहानिशा केल्यानंतरच नाव वगळले जाते, हे आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे. पण खोटे, तथ्यहीन आरोप करणे ही राहुल गांधींची नेहमीची सवय बनली आहे.

आपल्या बेताल आरोपांमुळे राहुल गांधी वारंवार न्यायालयात तोंडघशी पडतात. कधी ते माफी मागून मोकळे होतात. तर कधी त्यांना न्यायालयाकडून कठोर शब्द ऐकावे लागतात. राफेल खरेदी, चौकीदार चोर है, वीर सावरकर अशा सर्वच मुद्यांवर राहुल गांधी यांना अपमानित व्हावे लागले आहे. केवळ घटनात्मक संस्थांवर वारेमाप आरोप करून देशातील लोकशाही शासन व्यवस्था बदनाम करणे, लोकांची दिशाभूल करणे हेच काम राहुल गांधी करत आले आहेत. त्यांच्या विधानांवरून अनेकदा असे दिसून आले आहे की, ते बेकायदेशीर घुसखोरांना मतदानाचा अधिकार देऊ पाहतात. देशाच्या लोकशाहीवर त्यांना विश्वास नाही.

भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींना टोला हाणत म्हटले की, राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप साफ खोटे आहेत. असे आधारहीन आरोप करून राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी लोकशाहीचा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा अपमान केला आहे. त्यांना जनता कधीही जवळ करणार नाही.तर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्स पोस्ट करून राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत.

ते म्हणतात त्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन पध्दतीने मतदार यादीतून नाव वगळणे शक्य नाही. ज्या कोणाचे नाव वगळायचे असते त्याला त्याचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. त्याशिवाय एकही नाव वगळले जात नाही. 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारे नावे वगळण्याचे प्रयत्न झाले. आयोगाने ते वेळीच हाणून पाडले आणि त्याबाबत रितसर तक्रारही दाखल केली. वस्तुस्थिती अशी आहे की, आळंद मतदारसंघात 2018 साली भाजपाचे सुभद गुत्तेदार विजयी झाले होते. तर त्यापुढील 2023 च्या निवडणुकीत काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले आहेत.

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या मतदार यादीतील नाव वगळण्याच्या आरोपांना आपल्या अधिकृत एक्स हँडलवर उत्तर देताना म्हटले की, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी मागितलेली माहिती दोन वर्षांपूर्वी राज्य सीआयडीला दिली होती. आळंद विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत, 21 फेब्रुवारी 2023 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता आणि 6 सप्टेंबर 2023 रोजी कलबुर्गी पोलिस अधीक्षकांना सर्व माहिती देण्यात आली होती. मतदारांना वगळण्याच्या बाबतीत मोठ्या संख्येने ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्याबाबत संशय असल्याने निवडणूक आयोगाने सुरुवातीलाच एफआयआर नोंदवला, छाननीनंतर 6,018 अर्जांपैकी फक्त 24 अर्ज खरे असल्याचे आढळले, तर उर्वरित 5,994 अर्ज खोटे असल्याचे आढळले.

कर्नाटकच्या निवडणूक आयोगाने आक्षेप घेणाऱ्याचे तपशील, फॉर्म संदर्भ क्रमांक, आक्षेप घेणाऱ्याचे नाव, त्याचा एपिक क्रमांक आणि लॉग-इनसाठी वापरलेला मोबाइल नंबर आणि प्रक्रियेसाठी आक्षेप घेणाऱ्याने प्रदान केलेला मोबाइल नंबर, सॉफ्टवेअर अनुप्रयोग माध्यम, आयपी पत्ता, अर्जदाराचे ठिकाण, फॉर्म भरण्याची तारीख – वेळ यासह सर्व माहिती पोलीस अधीक्षकांना सोपवली आहे.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात 6,850 बोगस नावे घुसवण्यात आल्याचा आरोप केला. या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विद्यमान आमदार सुभाष धोटे यांची भाजपाचे देवराव भोंगळे यांच्याशी लढत होती. या लढतीत भोंगळे यांनी 3,054 मतांनी निसटता पराभव केला. भोंगळे यांना 72,882 मते तर धोटे यांना 69,828 मते मिळाली. यावरून हेराफेरी करून वाढवण्यात आलेल्या 6,850 मतांमुळे काँग्रेसचा पराभव झाला, असा दावा आता करण्यात येत आहे.

मतचोरीमुळे राजुऱ्यात काँग्रेसचा पराभव?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात 6,850 बोगस नावे घुसवण्यात आल्याचा आरोप केला. या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विद्यमान आमदार सुभाष धोटे यांची भाजपाचे देवराव भोंगळे यांच्याशी लढत होती. या लढतीत भोंगळे यांनी 3,054 मतांनी निसटता पराभव केला. भोंगळे यांना 72,882 मते तर धोटे यांना 69,828 मते मिळाली. यावरून हेराफेरी करून वाढवण्यात आलेल्या 6,850 मतांमुळे काँग्रेसचा पराभव झाला, असा दावा आता करण्यात येत आहे.


हे देखील वाचा – 

 सरकारचा ‘तो’ निर्णय ठरला वादग्रस्त, राज्यातील 1.8 लाख डॉक्टरांचा संप

अदानी समूहाला ‘क्लीन चिट’; हिंडेनबर्गचे सर्व आरोप SEBI ने फेटाळले, 

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद

Web Title:
संबंधित बातम्या