Uddhav & Raj Thackeray – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि पालिका निवडणुकांसाठी (Municipal elections) शंभर दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या निवडणुकांसाठी उद्धव व आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. आज दोघांनी कल्याण व अंबरनाथ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र मार्गदर्शन करीत मतचोरीकडे लक्ष देत निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले. विशेष म्हणजे हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणूक तयारीच्या पहिल्या टप्प्यात दोघांनी एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना लक्ष्य केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण आणि अंबरनाथ शहरात दौरा केला, तर उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे त्याच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde)यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेला खिंडार पाडले आहे. डोंबिवलीतील मनसेच्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अंबरनाथमध्ये दाखल होताच राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. जवळपास तीन वर्षांनंतर राज ठाकरे अंबरनाथ शहरात आले होते. त्यांनी आज अंबरनाथ विद्यार्थी सेना कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर पनवेलकर सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, जे सोडून गेले ते आपले नाहीत. त्यांचा विचार करू नका. युती किंवा आघाडी याचा निर्णय नंतर घेऊ. त्याआधी तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदान याद्यांवर विशेष लक्ष द्या. एका यादीवर दोन प्रतिनिधी देऊन काम करा. याद्यांवर काम करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल. आपण पहिल्यापासून मतदान प्रक्रियेबद्दल आवाज उठवत आहोत. निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणात मतचोरी होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अशी मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली. म्हणूनच प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या प्रभागातील मतदार याद्या तपासा. त्यात असलेल्या त्रुटी दूर करा. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याची नोंद घ्या.
या बैठकीमध्ये पितृपक्षाचा विषय निघाला. त्यावर आपण पितृपक्षाला वाईट का समजतो? असा सवाल करीत राज ठाकरे यांनी हा विषय उडवून लावला. राज यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही अंबरनाथ बदलापूर, कल्याण-डोंबिवली येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकांची तयारी सुरू करायला सांगितली. ते म्हणाले की, निवडणुकीला अवघे शंभर दिवस उरले आहेत. निवडणुकीत दुबार मतदान होऊ देऊ नका. यादीचे वाचन करत असताना आपले मतदार ओळखून त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणे आवश्यक आहे.
यादीतील कोणते मतदार मयत झाले, कोण स्थलांतरित झाले, आपल्या पक्षाचे मतदार किती व इतर पक्षाचे किती याची नोंद ठेवा. यादीमध्ये संशयित व दुबार मतदार आढळल्यास त्याची तक्रार स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करा. विरोधी पक्षाच्या कार्यक्रमावर नजर ठेवा. आपल्या प्रभागातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करा. विरोधक अफवा पसरवतील, खोटी आश्वासने देतील. त्यांना बळी पडू नका. मनसेसोबत युती करायची की नाही हा निर्णय आम्ही वरच्या पातळीवर घेऊ, पण तुम्ही तयारीला लागा.
राज-उद्धव बॅनरवर एकत्र (Raj–Uddhav Together on Banners)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या शक्यतेला आता अधिकच बळ आले आहे. दोन्ही पक्षांकडून सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे संकेत दिले जात आहेत. राज ठाकरे यांच्या अंबरनाथ (Ambernath)दौऱ्याआधी शहरात झळकलेल्या बॅनरवर राज-उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो दिसले.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या ठाकरे बंधूंच्या भेटीचे हे फोटो होते. त्यावर महाराष्ट्रात फक्त ठाकरेच असा मजकूर होता. आदेश मिळाले तर दसऱ्याचे सोने लुटायला वाजतगाजत जाऊ, अशी कार्यकर्त्यांची भावना या बॅनरवर लिहिली होती. मागील दोन महिन्यांत ठाकरे बंधूंची तब्बल चार वेळा भेट झाली आहे. यामुळे दसरा मेळाव्यात दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चाही अंबरनाथच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
हे देखील वाचा –