Home / लेख / Navratri Shopping – नवरात्रीत रंगलेलं भुलेश्वर मार्केट; असंख्य पर्याय व खरेदीचा आनंद

Navratri Shopping – नवरात्रीत रंगलेलं भुलेश्वर मार्केट; असंख्य पर्याय व खरेदीचा आनंद

राजश्री दहीफळे – (Navratri Shopping) नवरात्र उत्सव जवळ येताच मुंबईतील प्रत्येक कोपरा उत्साहाने भरलेलाअसतो. हा उत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चाच नाही,...

By: Team Navakal
Navratri Shopping

राजश्री दहीफळे – (Navratri Shopping) नवरात्र उत्सव जवळ येताच मुंबईतील प्रत्येक कोपरा उत्साहाने भरलेलाअसतो. हा उत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चाच नाही, तर रंगांची, आनंदाची आणि पारंपरिक वेशभूषेची एक अनोखी मेजवानी असते. अशा वेळी, खरेदीसाठी मुंबईकरांची पहिली पसंती असते, ती म्हणजे स्ट्रीट शॉपिंग मार्केट. त्यात दक्षिण मुंबईतील भुलेश्वर मार्केट (Bhuleshwar Market) हे नवरात्री खरेदीसाठी मुंबईकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे. आता येथे गजबज सुरू झाली असून, डिझायनर कपड्यांपासून ते महिलांच्या मेकअपपर्यंत सर्व वस्तू अतिशय परवडणाऱ्या किमतीत येथे उपलब्ध आहेत.

भुलेश्वर मार्केटमध्ये शिरताच नवरात्रीचा खरा रंग अनुभवता येतो. अरुंद गल्ल्या आणि गर्दीत दुकानांमध्ये व रस्त्यावर, फूटपाथवर सप्तरंगी पोशाखांची, पारंपरिक वस्तू दिसतात. विशेषतः महिलांसाठी येथे चनिया-चोली (chaniya-choli), घागरा-चोली, लेहेंगा, वेगवेगळ्या प्रकारचे रेडिमेड ब्लाउज (Ready-to-wear free-size blouses), पोटली बॅग, रंगीत दुपट्टे, दागिने आणि विविध प्रकारचे कुर्ती सेट वाजवी दरात मिळतात. खासकरून वेगवेगळ्या फॅशनचे रंगीबेरंगी तयार फ्री साईज ब्लाऊज आणि त्याला मॅचिंग ओढणी यावर खरेदीसाठी झुंबड उडते.

गुजरात व राजस्थानहून (Gujarat and Rajasthan)खास आणलेल्या आरसा वर्कच्या ड्रेसना यंदाही प्रचंड मागणी आहे. तरुणाईसाठी आधुनिक फ्युजन ड्रेसही उपलब्ध असल्याने तरुण ग्राहकांची येथे नेहमीच गर्दी असते. नवरात्रीत पोशाखात दागिनेही तितकेच महत्त्वाचे असतात. या बाजारपेठेत ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी बांगड्या, झुमके, मंगटिका, बाजुबंध,कंबरपट्टा, बाली, हँडमेड नेकलेस, इमिटेशन ज्वेलरी, मराठी नथ, राजपुती नथ, खड्यांचे दागिने यात भरपूर प्रकार मिळतात. ते पाहून खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. तुळजाभवानी मातेला आणि तिच्या भक्तांना आवडणारी कवड्याची माळ आणि त्यापासून तयार केलेल्या दागिन्यांना देखील भरपूर मागणी आहे.

हळदी, मेहंदी किंवा बेबी शॉवरसाठी वापरले जाणारे फुलांचे दागिनेही येथे सहज मिळतात. किफायतशीर दरात मिळणाऱ्या आकर्षक दागिन्यांमुळे खरेदीदारांची गर्दी दिवसेंदिवस वाढते. घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे माती,धान्य, टोपली (दुरडी) याचे लहान स्टॉल येथे आहेत. सध्या मातीच्या दिव्यांपासून ते कलाकुसर केलेल्या आकर्षक दिव्यांपर्यंत विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत, जे घराची शोभा वाढवतात. याशिवाय देवीची ओटी, चुनरी,कलश, नारळ, देवीचे मुखवटे, १६ शृंगार आणि इतर पूजा साहित्य ही येथे सहज मिळते.

रस्त्याच्या कडेला दांडियाप्रेमींसाठी दांडियाची (dandiya) लहान दुकाने येथे आहेत. लाकडी दांड्यांपासून ते रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेल्या, रोटेटिंग दांडिया,प्लास्टिक दांडिया, ​आरसे आणि घुंगरू लावलेल्या दांडिया येथे मिळतात.लहान मुले, तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक आवडीनुसार दांडिया खरेदी करतात.

मुंबईच्या विविध भागांतून तसेच बाहेरगावाहूनही अनेक लोक नवरात्रीपूर्वी खास भुलेश्वरला भेट देतात. गर्दीतूनही खरेदी करण्याचा अनुभव ग्राहकांसाठी खास असतो. या बाजारपेठेत सणासुदीनुसार व्यवसाय बदलत असतो. गणेशोत्सवात डेकोरेशन साहित्य, दिवाळीत दिवे व लक्ष्मीपूजनाचे साहित्य, फटाके तर ख्रिसमसला ख्रिसमस ट्री, मेणबत्त्यांपासून ते सजावटीपर्यंत सर्व काही येथे मिळते.

खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले भुलेश्वर मार्केट ही केवळ एक बाजारपेठ नाही, तर मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचे नाव भुलेश्वर महादेव मंदिरावरून (Ancient Bhuleshwar Mahadev Temple)ठेवण्यात आले. जे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिरामुळे या भागाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी हे ठिकाण गुजरात आणि मारवाडी व्यापारी समुदायाचे केंद्र होते, जे आजही कायम आहे. त्यामुळे, पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि पूजा साहित्य यांसारख्या वस्तूंसाठी हे ठिकाण नेहमीच आघाडीवर राहिले आहे.


हे देखील वाचा 

GST कमी झाल्याने गाड्या स्वस्त; Jaguar Land Rover ने जाहीर केल्या नव्या किंमती, ‘या’ मॉडेलवर 30 लाखांची सूट

मतचोरीकडे लक्ष द्या! तयारीला लागा उद्धव व राज ठाकरेंचे एकनाथ शिंदे लक्ष्य

मंत्र्यांनो जमत नसेल तर खुर्च्या खाली करा! अजित पवारांचा दम

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या