India vs Pakistan – Opposition Fades ! Will Jay Shah Watch the Match?
India vs Pakistan – Opposition Fades – दुबईत आज दुसरा भारत-पाक (India vs Pakistan) सामना होणार ! मात्र विरोध मावळला! जय शहा सामना पाहणार का? मुंबई- आशिया चषक टी-20 (Asia Cup T20 cricket)क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत उद्या भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेत भारत-पाक दुसऱ्यांदा भिडणार आहे. गेल्या सामन्यावेळी पाकिस्तानशी खेळू नये अशी जोरदार मागणी झाली होती. यावेळी मात्र विरोध मावळला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने (UBT) भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. सामन्याविरोधात आंदोलने केली गेली. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाचे अधिकारी सामन्याला गेले नाहीत. आयसीसी प्रमुख जय शहा (ICC Chairman Jay Shah)हेही सामना पाहायला गेले नाहीत. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी पाकिस्तानशी खेळू नये, अशी ठाम भूमिका जाहीरपणे घेतली. तरीही सामना झाला. मात्र मैदानात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यामुळेही हा सामना वादात सापडला होता. उद्याच्या सामन्याबाबत मात्र उबाठाने कसलाही विरोध केलेला नाही. त्यामुळे उद्या मैदानात भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार का? आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी सामन्याला उपस्थित राहाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारताने आतापर्यंतच्या स्पर्धेतील सगळे सामने जिंकले असल्याने या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.14 सप्टेंबर रोजी या दोन देशांत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 गडी राखून सहज विजय मिळवला होता. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या सामन्याला शहीद जवानांच्या कुटुंबियांनी उघड विरोध केला होता. तर उबाठाने या सामन्याविरोधात महाराष्ट्रात ’माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले होते. उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथेही या सामन्याच्या निषेधार्थ आंदोलने झाली. अनेक ठिकाणी टीव्ही फोडण्यात आले, बॅट-स्टम्प जाळण्यात आल्या होत्या. हरभजन सिंग, केदार जाधव यासारख्या माजी क्रिकेटपटूंनीही या सामन्याला विरोध केला होता.
सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर ’बॉयकॉट इंडिया व्हर्सेस पाकिस्तान’ ट्रेडिंग झाले होते. याचे पडसाद स्पर्धेच्या ठिकाणी दुबईतही उमटले. विरोधामुळे सामन्याआधी होणारी दोन्ही कर्णधारांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. भारतीय क्रिकेट बोर्डाने बहुदेशीयस्पर्धेत पाकिस्तानशी खेळावेच लागते, अशी भूमिका घेतल्याने भारताने सामन्यातून माघार घेतली नाही. परंतु भारतीय क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी या सामन्याकडे फिरकलेच नाहीत. त्यांनी सामन्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता. भारत-पाकिस्तान सामना कुठेही असो, स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असते, मात्र दुबईतील सामन्यावेळी तुलनेने कमी प्रेक्षक स्टेडियममध्ये होते.
या सामन्यात नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अलीशी हस्तांदोलन केले नाही. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंगरुममध्ये परतले. या प्रकारामुळे नाराज झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडे (आयसीसी) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावर सुरुवातीला कारवाई न झाल्याने पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध सामना न खेळण्याची धमकी दिली होती. अखेर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. त्यानंतर सामना उशिराने सुरू करण्यात आला.
आता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारत-पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यावेळी उबाठाकडून बहिष्काराचा सूर उमटलेला नाही. त्यामुळे उबाठाची भूमिका मवाळ झाली आहे का, असे विचारले जात आहे. हा सामना टीव्हीवर बघणारेही देशद्रोही आहेत, अशी भूमिका उबाठाने घेतली होती. परंतु अनेकांनी तो टीव्हीवर बघितला होता. यावेळी सर्वच सामना पाहतील असे चित्र आहे .
यंदाची आशिया चषक स्पर्धा भारतातच होणार होती. परंतु पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिल्याने ती तटस्थ ठिकाणी म्हणजे संयुक्त अरब अमिरातीत होत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात होणार असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेवेळी भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने भारताचे सामने दुबईत खेळवण्यात आले होते. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. या स्पर्धेपूर्वी भारत-पाकिस्तान क्रिकेट बोर्डांत झालेल्या करारानुसार भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांच्या देशात जाऊन क्रिकेट खेळणार नाहीत. हा करार 2027 पर्यंत लागू राहणार आहे.
दुसऱ्या सामन्यातही पायक्रॉफ्टच
भारत-पाकच्या पहिल्या सामन्यात ज्यांच्यावरून वाद झाला ते झिम्बॉव्बेचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हेच दुसऱ्या सामन्याचेही सामनाधिकारी असणार आहेत. आयसीसीने तशी घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असा दावा केला होता की, पायक्रॉफ्ट यांनीच पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करू नका, असे सांगितले होते. त्यामुळे अँडी पायक्रॉफ्टवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळलाच. शिवाय दुसऱ्या सामन्यातही त्यांच्यावरच सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवून त्यांच्यामागे ठाम उभे असल्याचे दाखवून दिले.
हे देखील वाचा –