Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (former Vice President Jagdeep Dhankhar) यांचा सरकारी घरामध्ये जीव गुदमरत होता, असा खळबळजनक खुलासा इंडियन नॅशनल लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला (Abhay Chautala) यांनी केला आहे. एका पॉडकास्टमध्ये चौटाला म्हणाले की, धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत होते. सरकारी घरात त्यांचा जीव गुदमरत होता, त्यामुळे त्यांनी दक्षिण दिल्लीतल्या छतरपूरमधील आमच्या फार्महाउसवर स्थलांतर केले.
चौटाला म्हणाले की, राजीनाम्यानंतर माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा त्यांनी सांगितले होते, की या घरात जीव गुदमरल्यासारखे वाटत आहे. मला येथे राहायचे नाही. त्यानंतर मी त्यांना फार्महाऊसमध्ये येऊन राहण्याचा आग्रह केला. आमचे त्यांच्याशी ४० वर्षांपासूनचे कौटुंबिक नाते आहे. खरे तर राजीनाम्यानंतरही धनखड हे १५ महिने उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानात राहू शकत होते. नवीन निवासस्थान मिळत नाही तोपर्यंत त्यांना कुणीही तिथून बाहेर काढू शकत नाही.
धनखड यांनी २१ जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्येतीचे कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर १ सप्टेंबरला त्यांनी उपराष्ट्रपतींसाठी असलेले सरकारी निवासस्थान रिकामे केले. सध्या ते चौटालांच्या फार्महाऊसवर मुक्कामी आहेत. अभय चौटालांच्या मते, आता धनखड यांची तब्येत ठणठणीत असून ते रोज सकाळ-संध्याकाळ टेबल टेनिस खेळतात आणि पोहण्याचा व्यायामही करतात.
माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल हे जाट समाजाचे मातब्बर नेते होते. हरयाणासोबतच शेजारच्या राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येत्या २५ सप्टेंबरल चौधरी देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त रोहतक येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला धनखड उपस्थित राहणार की नाही, याबद्दल उत्सुकता आहे. चौटाला यांनी याबद्दल अजून धनखड यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले. धनखड हे राजस्थानातील जाट समाजाचे नेते आहेत.
हे देखील वाचा –
मतदार यादी पुनर्परिक्षण ३० सप्टेंबरपर्यंत तयारी करा ! निवडणूक आयोगाचे निर्देश
सबसे बडा जुमलेबाज! काँग्रेसकडून मोदींचा जेमिनी व्हिडिओ प्रसिद्ध
सबसे बडा जुमलेबाज! काँग्रेसकडून मोदींचा जेमिनी व्हिडिओ प्रसिद्ध