Buy Swadeshi, Be Self-Reliant – देशात उद्यापासून जीएसटीची (GST) नवी कररचना लागू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी आज देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी आवाहन केले की, जीएसटी कमी केल्याने देशात बचत उत्सव सुरू होत आहे. त्याचा सर्वांना फायदा होईल. आता आत्मनिर्भर बनण्यासाठी त्यांनी देशातील लोकांनी बनवलेल्या स्वदेशी वस्तू विकत घ्या. तसे केल्याने देशाची वेगाने प्रगती होईल. उत्पादन, गुंतवणूक वाढेल.(Buy Swadeshi, Be Self-Reliant)
आपल्या 19 मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले की, आता तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल. याचा सर्वांना फायदा होईल. 2017 साली मी जीएसटी आणला, तेव्हा नवा इतिहास सुरू केला. त्याआधी वेगवेगळे कर होते. प्रत्येक ठिकाणी कराचे नियम वेगळे होते. अनेक फॉर्म भरावे लागत होते. कर आणि टोलचा त्रास होता.
सर्व खर्च गरिबांकडून वसूल केले जात होते. एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठविणे अत्यंत खर्चिक होते. 2014 साली आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा सर्वांशी चर्चा करून अर्धा डझन करांतून मुक्ती देत ‘एक देश, एक कर’ प्रणालीचा जीएसटी आणला. आता त्यात सुधारणा केली आहे, ज्यात फक्त दोन टप्प्यांचा कर लागेल.
मोदी पुढे म्हणाले की, दररोज वापराच्या वस्तू, खाण्याचे सामान, विमा अशा वस्तूंवर केवळ 5 टक्के कर (Tax)लागेल. ज्यावर 12 टक्के कर होता, त्यातील 99 टक्के वस्तूंवर आता 5 टक्केच कर लागणार आहे. 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत आणि ते मध्यमवर्गात आले आहेत. असे गेल्या 11 वर्षांत घडले आहे.
मोदी म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे. सरकारने यावर्षी त्यांना आयकरांतही मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात बदल झाला आहे. गरिबांना, नव मध्यमवर्गीयांना दुहेरी भेट मिळाली आहे. जीएसटी कमी केल्याने त्यांना घरे, टीव्ही, रेफ्रीजेरेटर, बाईक आणि स्कूटर घेण्यावर कमी खर्च करावा लागेल.
प्रवास देखील स्वस्त होणार आहे. आपले स्वप्न साकार करणे अधिक सुलभ होणार आहे. आता पर्यटनही स्वस्त होईल. दुकानदारांमध्येही जीएसटी कमी झाल्याने उत्साह आहे. नागरिक देवो भवः हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. जीएसटी सुधारणा व आयकर सुधारणेमुळे देशात अडीच लाख कोटींची बचत होईल. त्यामुळेच हा बचतीचा उत्सव आहे. आता आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. याची जबाबदारी लघु व कुटीर उद्योगावर आहे. या उद्योगांनी स्वावलंबी बनले पाहिजे.
जी उत्पादने देशात उत्पादित होऊ शकतात त्यांचे उत्पादन करायला हवे. आपली उत्पादने जगात सर्वोत्तम असतील, हे लक्ष्य ठेवून काम करायला हवे. जीएसटी कपात आणि नियम व प्रक्रिया सुलभ केल्याने लघु आणि कुटीर उद्योगांना मोठा फायदा होईल. त्यांची विक्री वाढेल आणि कमी कर भरावा लागेल. या उद्योगांकडून मला खूप अपेक्षा आहे.
जेव्हा भारत प्रगतीच्या शिखरावर होता तेव्हा हे उद्योग त्याचा पाया होते. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा दर्जा सर्वोत्कृष्ट होता. मी सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो की, स्वदेशी उत्पादनाला त्यांनी गती द्यावी. आपण अनेक विदेशी वस्तू वापरतो. आता फक्त भारतात उत्पादन केलेल्या वस्तू विकत घ्या. आपल्याला प्रत्येक घर स्वदेशीचे प्रतीक बनवायचे आहे. दररोजच्या वस्तू परदेशी आहेत. त्यातून आपल्याला मुक्ती मिळवली पाहिजे. मी स्वदेशी विकत घेतो आणि विकतो ही प्रत्येक भारतीयाची वृत्ती बनली पाहिजे.
हे देखील वाचा –
भारतातल्या करव्यवस्थेत मोठा बदल, ‘GST 2.0 India’ मुळे गरजेच्या वस्तूंवर दिलासा
आरक्षण आर्थिक निकषांवर असावे की जातीवर आधारित ? सुप्रिया सुळे