BJP’s Changing Colours – From Shethji, Bhatji to OBC
तुळशीदास भोईटे – Navaratri’s 9 Political Coulur’s – भाजपा (BJP)सध्या भारताचा सर्वात बलवान पक्ष झाला आहे. सत्ता आणि संपत्ती या दोन्हीत त्याचा हात कुणी पकडू शकत नाही. पण हा पक्ष फार जुना नाही. भाजपची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांनी केली आणि देशाच्या राजकारणात पक्षाने अधिकृत प्रवेश घेतला.
भाजपाचा मूळ अवतार हा भारतीय जनसंघ (Bhartiya Jansangh)होता. भारतात आणीबाणी लादल्यानंतर त्याविरोधात सर्व पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टी स्थापन झाली. हा पक्ष काँग्रेसला (Congress) पराभूत करून सत्तेवरही आला. जे पक्ष जनता पार्टीत विलीन झाले त्यात भारतीय जनसंघही होता. जनसंघाचे आचार विचार धोरण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पूर्णपणे निगडित होते.
जनता पार्टी सत्तेत आल्यावर मित्रपक्षात वाद सुरू झाले आणि जनता पार्टी फुटली. त्यांचे सरकार कोसळले. त्यानंतर जनसंघात असलेल्या काही नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची स्थापना केली.हा पक्ष आता राजकारणात उतरण्यास सज्ज होता. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पक्षावर पूर्ण पकड होती.
आज ही पकड काहीशी ढिली झाली असली तरी प्रभाव कायम आहे. निवडणूक जाहीर झाली की, भाजपासाठी संघ स्वयंसेवक (RSS) रात्रंदिवस झटतात. त्यांची प्रचंड मदत होते. त्यामुळेच आजही भाजपाची सत्ता आली तरी महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुख पदावर संघाचाच कार्यकर्ता बसतो.
आज कडवट हिंदुत्ववादी अवतारात असणारा हा पक्ष स्थापनेवेळी मात्र गांधीवादी, समाजवादी होता. जनसंघाचे दिवंगत नेते दिनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावादाचा बोलबाला जास्त केला जात असे. भाजपाचे पहिले अध्यक्षही सर्वसमावेशक प्रतिमा असणारे अटलबिहारी वाजपेयी होते. मात्र 1984च्या निवडणुका आल्या त्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींची (EX PM Indira Gandhi) हत्या झालेली असल्याने त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सहानुभूतीच्या लाटेमुळे विक्रमी बहुमताने सत्तेत आली.

भाजपासह सर्वच विरोधी पक्ष या लाटेत वाहून गेले होते. भाजपाला फक्त दोन मतदारसंघांमध्ये यश मिळाले होते. त्यानंतर भाजपाची वाट बदलण्यास सुरुवात झाली. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येच्या राममंदिराचा मुद्दा पेटवला. अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली देशभर रथयात्रा काढण्यात आली. मंदिर वहीं बनाएंगे…जिस हिंदू का खून न खौले वह खून नहीं पानी है… या सारख्या आक्रमक घोषणांनी देश ढवळून निघाला. रक्तरंजित पर्व सुरू झाले.
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री मुलायम सिंह असताना बाबरी मशीद पाडणार्या कारसेवकांवर गोळीबार झाला. अयोध्या आंदोलन जनआंदोलन झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली. त्यानंतर देशात अनेक ठिकाणी आगडोंब उसळला. भाजपाचे हिंदुत्व विरोधात काँग्रेसचा समाजवाद यात भाजपा वरचढ ठरू लागला. 1984 साली दोन खासदार असलेला भाजपा टप्प्याटप्प्याने दोन आकडी करत तीन आकडी खासदार संख्येवर पोहोचला. उत्तरेतील राज्यांमध्ये सत्ताही मिळाली. महाराष्ट्रातही शिवसेनेसह भाजपा सत्तेत आली.
केंद्रीय राजकारणात भाजपाचा विस्तार होऊ लागला. 1995मध्ये लालकृष्ण अडवाणी भाजपा अध्यक्ष होते, ते पंतप्रधान पदाचे दावेदार होते, पण राममंदिर आंदोलनामुळे त्यांची कडवट हिंदुत्ववादी अशी प्रतिमा झाली होती. हे लक्षात घेत सर्वसमावेशक अशा अटलबिहारी वाजपेयींच्या नावाची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली.
ज्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे भाजपा वाढली त्याच अडवाणींना या आक्रमकतेमुळे उच्च पद मिळाले नाही. 1996च्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. सत्तेत आला. वाजपेयी पंतप्रधान झाले. पण त्यांना अनेक पक्ष सोबत घ्यायला लागले होते. अवघ्या 13 दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. 1998मध्ये वाजपेयी दुसर्यांदा पंतप्रधान झाले. यावेळीही भाजपाला विभिन्न विचारांच्या पक्षांची साथ घेऊन एनडीए सरकार स्थापन करावे लागले होते. वाजपेयींच्या सर्वसमावेशकतेमुळे हे सरकार 13 महिने चालले. अण्णा द्रमुकच्या जयललितांनी पाठिंबा काढला आणि हे सरकार पडले.
त्यांच्याच नेतृत्वाखाली पोखरण अणुचाचणी झाली, कारगिल युद्ध लढले गेले. 1999च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी तिसर्यांदा पंतप्रधानपदी आले. हे सरकार 2004 पर्यंत टिकले. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपाचा इंडिया शायनिंगचा आक्रमक प्रचार त्यांच्यावर उलटला. जनमताचा कौल भाजपाविरोधात गेला. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. संघाने पुन्हा अडवाणींना संधी दिली. पण 2009ची निवडणूकही भाजपाने गमावली. त्यातच अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन मोहमम्द जीना यांच्या कबरीचे दर्शन घेतले आणि त्यांना राष्ट्रपुरूष म्हटले.
यामुळे अडवाणी यांची जनमान्यता कायमची डागाळली. त्यानंतर वाजपेयी आणि अडवाणी हे दोन एक्के गमावलेल्या भाजपात संघाच्या पुढाकाराने नरेंद्र मोदी या गुजरातच्या भाजपा नेत्याचा उदय झाला. त्यांची गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवेळची भूमिका पाहून अडवाणी यांनी त्यांना सक्त विरोध केला. पण अडवाणी यांनाच बाजूला सारून संघाने मोदींना पुढे केले.
2012 पासून मोदींनी राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मिती सुरू केली. त्याचवेळी अण्णा हजारे, इंडिया अगेन्स्ट करप्शन यांनी आंदोलनांनी देश ढवळून काढला. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा एनडीएसह सत्तेत आला. पण त्यात बहुमतासाठी पुरेशा 272 जागा एकट्या भाजपाच्या होत्या, हे विशेष!
2014 पासून भाजपातच नाही तर देशाच्या राजकारणात एक मोदीपर्व सुरू झाले. 2019च्या निवडणुकीत भाजपाच्या एकट्याच्या जागा 303वर पोहोचल्या. 2024 मध्ये मात्र धक्का बसला. चारशेपारच्या घोषणा देणारी भाजपा 2019 मध्ये एवढ्याही जागा राखू शकली नाही. 240 वरच अल्पमतात अडली. मात्र, एनडीएच्या मित्रपक्षांच्या बळावर सत्ता राखू शकली. आता जरी बहुमत नसले तरी नरेंद्र मोदींचा प्रभाव आणि देशातील सर्वात लोकप्रिय नेता ही त्यांची प्रतिमा कायमच आहे. एकीकडे हे सारे होत असतानाच महाराष्ट्रातही बरंच काही घडत होते.
या पक्षाला महाराष्ट्रात सुरुवातीच्या काळात शेठजी – भटजींचा पक्ष मानले जात होते. वसंतराव भागवत महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा असताना त्यांनी शेठजी-भटजी प्रतिमेने आलेल्या मर्यादांवर मात करण्याचा विचार केला. त्यात आणखी एक म्हणजे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसमध्ये मराठा नेत्यांचा प्रभाव. त्यामुळे त्यांनी माधव फॉर्म्युला आणला. माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या तीन जातींचे समीकरण. वसंतरावांनी माळी समाजातील ना. स. फरांदे, धनगर समाजातील अण्णा डांगे आणि वंजारी समाजातील गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व पुढे आणले. त्याचबरोबर इतर समाजघटकांमधूनही नेते सक्रिय केले.
भाजपाचा सत्तेतील प्रवेश शरद पवारांमुळे झाला होता. जनसंघाच्या काळात शरद पवारांनी पुलोद प्रयोग केला. ते मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी जनसंघाचे आमदार मंत्रिमंडळात आले. पुढे 1995च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेसह सत्तेत आली. 2014मध्ये लोकसभा शिवसेनेसोबत लढल्यानंतर भाजपाने विधानसभेला स्वबळाचा नारा दिला. भाजपा क्र. 1चा पक्ष ठरला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पुढे शिवसेना 2019पासून दुरावली.

मविआ स्थापन करत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला साथ दिली. पुढे शिवसेना फुटली. महायुती पुन्हा सत्तेत आली, पण मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आले. नाराज न होता देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा नसताना मन मारत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. 2024च्या लोकसभेतील दारूण पराभवाच्या गर्तेतून विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुती यशाच्या शिखरावर पोहोचली.
सध्या महाराष्ट्रात भाजपा क्र. 1चा पक्ष आहेच. पण शेठजी भटजीपासून माधव, तिथून ओबीसी डीएनए ते आताची ब्रँड देवाभाऊमधून सर्वसमावेशकता. वेगवेगळे रंग बदलताना भाजपाने आपली संघाशी असलेली नाळ जपली आहे.
भाजपाने जपली आहे, त्यापेक्षाही संघाने भाजपावरील आपले नियंत्रण सोडलेले नाही. 2024मध्ये भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांनी संघाची गरज नाही म्हणताच संघ लोकसभा निवडणुकीत शांत राहिला. त्याचाच फटका बहुमतही गमावण्यात झाल्याचे सांगितले जाते. संघाशी असलेल्या नात्यामुळेच स्थापनेला गांधीवादी समाजवादी असणारा पक्ष सोबत हिंदुत्वही कायम राखणारा राहिला आहे.
आता सर्वसमावेशतेच्या ब्रँडिगमध्ये जहाल हिंदुत्व आडवे तर येणार नाही, अशी चिंता व्यक्त होत असते. मात्र, भगवा कायम राखत इतर अनेक रंगछटांना आपलंसं केल्याचे दाखवणार्या भाजपासाठी सर्वसमावेशकता हाच भविष्यातील रंग ठरण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाचा आत्मा जपत वाजपेयींसारखा उदारमतवादाचा हा रंगच भाजपासाठी सर्वात लाभदायी ठरू शकणारा आहे. प्रत्यक्षात तसे होईल का?
हे देखील वाचा –