Tendulkar’s Appeal – Girls’ Facilities in Clubs – देशातील महिला क्रिकेट आता चांगलेच रुजले आहे. दादरच्या शिवाजी पार्क (Dadar Shivaji Park Club)जिमखान्याने इथे मुलींसाठी विशेष चेजिंग रूमची सुविधा दिली आहे. तशीच ती देशातील सर्व क्लबमध्ये असावी, असे आवाहन विक्रमवीर भारतरत्न सचिन तेंडुलकर (Cricketer Sachin Tendulkar) यांनी आज केले. दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नुतन वास्तूचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेही (MNS Raj Thackrey) उपस्थित होते.
शिवाजी पार्क जिमखान्याला मुंबईच्या क्रिकेट विश्वात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे खेळलेल्या अनेक खेळाडूंनी पुढे देशाचे प्रतिनिधित्व केले. उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना सचिन तेंडुलकर यांनीही त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की, या क्लबमध्ये अनेक जुन्या खेळाडूंच्या आठवणी जतन केलेल्या आहेत.
मूळ संस्कृती जपत या क्लबने आधुनिकीकरण केले आहे. या कामात राज ठाकरे यांनी मोलाचा हातभार लावला आहे. अगदी लहान लहान गोष्टीतही त्यानी विशेष लक्ष घातलेले आहे. या क्लबमध्ये इतर सर्व सुविधा तर आहेतच त्याचबरोबर मुलींसाठी एक विशेष चेंजिंग रुमही तयार करण्यात आली आहे. हे मला विशेष वाटते.
आज मुलींचे क्रिकेट बहरत आहे. अशा वेळी केवळ मुंबईतीलच नव्हे तर देशातील सर्व क्लबमध्ये अशा प्रकारची सुविधा असावी. क्लबने चांगले काम केलेले आहे. आता क्रिकेटसह इतर खेळ खेळणाऱ्या मुलामुलींनी या सुविधेचा चांगला वापर करावा. यावेळी राज ठाकरे, आमदार महेश सावंत, मिलींद नार्वेकर, सदा सरवणकर यांच्यासह क्लबचे अनेक पदाधिकारी व माजी खेळाडूही उपस्थित होते. सचिन तेंडुलकर यांनी एका बॅटवर आपली स्वाक्षरी करून या नूतन वास्तूचे उद्घाटन केले. या क्लबमध्ये एक अत्याधुनिक व्यायामशाळा, टेनिस, टेबल टेनिस व बिलियर्ड्स टेबल असून एक चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंटही आहे.
दादरच्या शिवाजी पार्कची स्थापन १९४१ साली सध्याच्या जागेत झाली. त्याआधी न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब या संस्थेची स्थापना १९०९ साली मराठे यांनी केली. १९२७ साली तेव्हाचे महापालिका आयुक्त क्लेटॉन यांनी क्लबला ५ हजार चौरस यार्डाची जागा दिली होती. त्यानंतर १९४२ साली क्लबला अधिक जागा मिळाली व तेव्हापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. या क्लबने अनेक खेळाडू घडवले आहेत. खेळाडूंबरोबरच अनेक विचारवंत, लेखक, पत्रकार, विविध अधिकारी यांचाही या क्लबच्या वाटचालीत सहभाग आहे.
चौकट
राज ठाकरे-सरवणकर समोरासमोर (Raj Thackrey & Sada Sarvankar )
शिवाजी पार्क जिमखान्याच्या उद्घाटनाच्या वेळी राज ठाकरे आणि माजी आमदार सदा सरवणकर एकाच टेबलवर समोरसमोर बसले होते. मात्र, राज ठाकरे आमदार महेश सावंत यांच्याशीच बोलत होते. सदा सरवणकर आपला मोबाईल पाहत वेळ काढत होते. सदा सरवणकर यांच्यामुळेच राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचे शल्य कदाचित अद्याप राज यांच्या मनातून गेले नसावे. सदा सरवणकर यांनी मात्र नंतर माध्यमांशी बोलताना आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आशिष शेलारांची पाठ (Minister Ashish Shelar)
या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाही आमंत्रण दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्याशी आपली मैत्री तुटली, असे म्हणणाऱ्या शेलारांनी राज यांच्या उपस्थितीमुळेच इथे येण्याचे टाळल्याची चर्चा रंगली. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र आल्याच्या घडामोडींमुळेच शेलार नाराज झाले का, अशीही चर्चा रंगली होती.
हे देखील वाचा –
नवरात्रीचे राजकीय’ रंग ! भाजपाचे बदलते रंग – शेठजी, भटजी ते ओबीसी