Nilesh Lanke Criticized Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाने सांगलीतील राजकारण चांगलेच तापले आहे.
पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाने सांगलीत ‘संस्कृती बचाव मोर्चा’चे आयोजन केले होते. यावेळी खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी पडळकर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
‘त्या एसीत बसलेल्या आकाला धडा शिकवावा लागेल’
मोर्चामध्ये बोलताना खासदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर यांना थेट आव्हान दिले. “तुम्ही एकदा पोलीस बाजूला ठेवा आणि मग होऊन जाऊ द्या. जो वाचाळवीर बोलला तो आधी दोन पोलीस घेऊन फिरत होता, आता चार पोलीस घेऊन फिरत आहे. तुमच्यात दम असेल तर एकदा रणांगणात या. तुम्ही राहू नाहीतर आम्ही राहू. हे असे बालिश धंदे बंद करा,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “या वाचाळवीरांचा जो ‘आका’ आहे, तो एसीत बसून जाती-जातीमध्ये भांडणे लावतो. समाजात चांगले काम करणाऱ्यांबद्दल गरळ ओकायला लावतो. त्या आकालाच धडा शिकवला पाहिजे.” तसेच, सरकारकडे विकासाचा अजेंडा नसल्यामुळे समाजात हिंदू-मुस्लिम आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
गोपीचंद पडळकर म्हणजे ‘बेन्टेक्सचे सोने’: रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनीही यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने आहे. हा विषय केवळ तालुका किंवा जिल्ह्याचा नाही, तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे.” आम्हीही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो, पण आम्ही शब्दांची पातळी जपतो.
रोहित पवार यांनी भाजपवरही निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्रातील महामानवांनी आम्हाला विचार दिला. परंतु काही लोक स्वतःला चाणक्य समजतात, आणि बहुजन समाजाच्या नेत्यांना पवार कुटुंबावर बोलण्यासाठी वापरून घेतात. यांचा बोलवता धनी कोण? त्यांना बोलले पाहिजे.” निवडणूक आली की हे लोक समाजात तेढ निर्माण करतात, कधी हिंदू-मुस्लिम, कधी मराठा-ओबीसी तर आता मराठी-अमराठी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अपक्ष खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते.
हे देखील वाचा – राज आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टिझरने चर्चांना उधाण