Sahibzada Farhan celebration: आशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) याने केलेल्या एका कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
भारतासमोर अर्धशतक (58 धावा) झळकावल्यानंतर त्याने बॅटला बंदुकीसारखे धरून ‘गन गेस्चर’ (Gun Gesture) करत सेलिब्रेशन केले होते. या सेलिब्रेशनवर चाहत्यांनी जोरदार टीका केल्यानंतर फरहानने यावर उत्तर दिले आहे.
“लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही.”, असे उत्तर टीकेनंतर फरहानने यावर दिले आहे.
इनको कौन समझाये ये बैट है AK47 नहीं 😡😡#INDvPAK
— Shivani (@shivani_di) September 21, 2025
pic.twitter.com/oV456mlCXq
सेलिब्रेशन वादाच्या भोवऱ्यात
भारतविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फरहानने 45 चेंडूत 58 धावांची खेळी करत पाकिस्तानला 171 धावांचा टप्पा गाठण्यास मदत केली. त्याची ही खेळी संघासाठी महत्त्वाची ठरली, पण त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या सेलिब्रेशनची झाली.
त्याने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ‘गन गेस्चर’ केला, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, असे वर्तन भारत-पाकिस्तान सामन्यासारख्या संवेदनशील वातावरणात योग्य नसल्याचे म्हटले. खासकरून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केलेले हे सेलिब्रेशन वादाचे कारण ठरले आहे.
पत्रकार परिषदेत दिले स्पष्टीकरण
या वादावर फरहानने पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. “मी जास्त सेलिब्रेशन करत नाही. पण अचानक माझ्या मनात आले की आज सेलिब्रेशन करूया. मी ते केले. लोक ते कसे घेतील हे मला माहीत नाही आणि मला त्याची पर्वाही नाही,” असे तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला, “तुम्ही जिथे कुठे क्रिकेट खेळता, तिथे आक्रमक क्रिकेट खेळायला हवे. फक्त भारतच नाही, तर प्रत्येक संघाविरुद्ध आक्रमक खेळा. जसा आम्ही आज खेळलो.”
हे देखील वाचा – राज आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टिझरने चर्चांना उधाण