Netflix Series:अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) च्या दिग्दर्शन केलेली पहिली वेब सीरिज ‘द बाड्स ऑफ बॉलिवूड’ (The Ba***ds of Bollywood) सध्या चर्चेत आहे. सध्या नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सीरिजमध्ये The Ba***ds of Bollywood चा समावेश आहे.
मात्र, आता ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘ई-सिगारेट’ वापरताना दिसल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच मुंबई पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे.
नेमकी तक्रार काय?
‘लीगल राईट्स ऑब्झर्वेटरी’ नावाच्या एका संस्थेतील विनय जोशी यांनी NHRC कडे ही तक्रार दाखल केली आहे. 22 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या वेब सीरिजमध्ये एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला (रणबीर कपूर) ‘ई-सिगारेट’ वापरताना दाखवले आहे, जी भारतात प्रतिबंधित आहे. विशेष म्हणजे हे दृश्य कोणत्याही चेतावणी किंवा डिस्क्लेमरशिवाय दाखवण्यात आले आहे.
या दृश्यामुळे तरुण प्रेक्षकांवर नकारात्मक परिणाम होईल आणि ते प्रतिबंधित वस्तूंचा वापर करण्यास प्रेरित होतील, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी अभिनेते, निर्माते आणि नेटफ्लिक्सवर भारतीय कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सिरीजमध्ये रणबीरचा महत्त्वाचा कॅमिओ
आर्यन खान दिग्दर्शित या सात-एपिसोडच्या सिरीजमध्ये अनेक मोठ्या स्टार्सनी कॅमिओ केला आहे. यापैकीच एका सीनमध्ये रणबीर कपूर देखील आहे. या सीनमध्ये तो दिग्दर्शक करण जोहर आणि मालिकेतील प्रमुख कलाकाराच्या मॅनेजर सान्याला (आन्या सिंग) भेटतो. याच भेटीदरम्यान रणबीर कपूर ‘वेप’ (vape) वापरताना दिसतो. मात्र, या काही सेकंदाच्या सीनमुळे नेटफ्लिक्सलची सीरिज वादात सापडली आहे.
दरम्यान, ‘The Ba***ds of Bollywood’ ही सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये रणबीर कपूरसोबतच शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग आणि इम्रान हाश्मी यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांनीही कॅमिओ केला आहे.
हे देखील वाचा – ‘लोक काय विचार करतात याची मला…’; भारताविरुद्धच्या सामन्यातील ‘गन गेस्चर’ सेलिब्रेशनवर पाकच्या खेळाडूचे स्पष्टीकरण