Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय वारसदाराबद्दल एका महत्त्वाच्या प्रश्नावर दिलखुलास चर्चा केली आहे. आपल्या कुटुंबातील कोणालाही राजकारणात आणणार नाही या जुन्या विधानाचा संदर्भ देत, फडणवीस यांनी त्यांची मुलगी राजकारणात येणार का, याविषयी भाष्य केले आहे.
तिला वकील बनण्याची इच्छा आहे. ती राजकारणात येईल असे वाटत नाही. तिला यायचे असेल तर ती येऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच, त्यांचे आणि मुलीचे नाते खूप चांगले असून त्यांच्यात एक चांगला बॉन्ड आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘माझी मुलगी म्हणून तिला फायदा मिळणार नाही’
एबीपी न्यूजला दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुलगी सध्या लहान आहे. ती राजकारणात येईल असे वाटत नाही. ती सध्या 11वी मध्ये शिकत आहे. तिला वकील बनायचे आहे.
मात्र, जर भविष्यात तिला राजकारणात यायची इच्छा झालीच, तर तिला सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ‘क्लास वन’ पासून सुरुवात करावी लागेल, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
“माझी मुलगी म्हणून तिला राजकारणात प्रवेश मिळणार नाही. तिला यायचे असेल, तर तिने सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम सुरू करावे आणि ज्या पदापर्यंत तिला जाणे शक्य होईल, तेथपर्यंत तिने जावे. पण माझी मुलगी आहे, म्हणून तिला फायदा मिळणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
मी काही फार चांगला पिता नाही, पण…
या मुलाखतीत फडणवीस यांनी आपल्या वडिलांच्या भूमिकेवरही भाष्य केले. व्यस्त राजकीय जीवनामुळे ते मुलीला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत याची कबुली त्यांनी दिली. “मी काही फार चांगला पिता तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो,” असे ते म्हणाले.
हे देखील वाचा – Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी ९ ऑक्टोबरला