Pune News: उच्च पद मिळवण्याच्या लालसेपोटी पुण्यातील एका कॉलेजच्या रसायनशास्त्र प्राध्यापकाने थेट केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दिला जाणारा प्रतिष्ठित शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (Shanti Swarup Bhatnagar Award) मिळाल्याचे बनावट पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वीरेंद्र सिंग यादव नावाच्या सहप्राध्यापकाला अटक केली आहे.
केंद्रीय मंत्र्यांची बनावट सही, खोट्या निवडपत्राचा दावा
पुण्यातील वाघोली परिसरातील एका कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या वीरेंद्र सिंग यादव याला पोलिसांनी अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक (318 (4)) आणि बनावटगिरी (336) सह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मंत्रालयाच्या निदर्शनास आले की प्राध्यापक यादव याची 2025-26 या वर्षासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी निवड झाल्याचा दावा करणारे एक पत्र प्रसारित झाले आहे.
तपासणीदरम्यान, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR-HRDC) च्या अधिकाऱ्यांनी या पत्रावर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांची बनावट सही असल्याचे आढळले.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, 2025-26 या वर्षासाठी कोणत्याही व्यक्तीची निवड या विज्ञान पुरस्कारासाठी झालीच नव्हती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. यादवने विज्ञान क्षेत्रात उच्च पद मिळवण्यासाठी हे बनावट पत्र तयार केले होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप कारपे यांनी सांगितले की, यादव याला 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या फसवणुकीत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.
हे देखील वाचा – रेल्वेच्या 10 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला मिळणार लाभ?