Navaratri’s 9 Political Coulur’s – Will Comprehensive Brighten Congress’s Future?
तुळशीदास भोईटे – Will Comprehensive Brighten Congress’s Future? – काँग्रेस (Congress) खरंतर पूर्ण नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.(Indian National Congress)पण मधला इंदिरा काँग्रेस (Indira Congress) या नावाचा कालावधी वगळला तर लोकांच्या तोंडी रुळलेलं नाव काँग्रेस हेच. मुंबईत 28 डिसेंबर 1885 रोजी झालेल्या स्थापनेपासून आजवर गेली 140 वर्षे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला जणू पर्यायी नाव ठरलेला काँग्रेस पक्ष.
लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak), महात्मा गांधी (Mahatma Gandhi), पंडित नेहरू (Pandit Nehru), नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose), सरदार पटेल (Sardar Patel), मौलाना आझाद (Maulana Azad)असे एक नाही अनेक नेते. ते नेते ज्यांनी ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीचे नेतृत्व केले. तेच नेते ज्यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व होतं. काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष. देशभर अस्तित्व असलेला. देशाची आणि बहुतेक राज्यांमधील सत्ता गेली तरीही प्रभावशाली असलेला.
नेहरु युगानंतर इंदिरा काळात इंडिकेट सिंडिकेटपासून पुढे इंदिरा, अर्स, समाजवादी, राष्ट्रवादी असे अनेक काँग्रेस प्रयोग झाले. त्यातील इंदिरा – राजीव गांधींनंतरच्या काळातील राष्ट्रवादी, तृणमूल तर चाललेही. खरंतर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनाही मोठा फटका बसला. पण सक्रिय राहत त्या लढत राहिल्या. पुढच्याच निवडणुकीत त्यांनी दमदार पुनरागमन केलं. पण तेव्हापासूनच काँग्रेसची पकड ढिली पडू लागल्याचं दिसू लागलेलं.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या 1984 च्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विक्रमी यश मिळवणारा हा पक्ष त्याच लोकसभेच्या कालावधीत खंगू लागला. 1991 च्या राजीव गांधींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत आला. देशाच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरणारं आर्थिक उदारीकरणाचे धोरण याच सत्ता कालावधीतील.
नरसिंहरावांच्या नेतृत्वा-खालील सरकारमधील अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांचं ते व्हिजन. देश आर्थिकदृष्ट्या सावरला, पण तो कालावधीही पक्ष म्हणून काँग्रेससाठी वाईटच होता. त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली. ती पुढेही जात राहिली. काँग्रेस पुन्हा सत्तेत परतली ती 2004मध्येच. नरसिंहरावांनंतर पुन्हा गांधी घराण्याबाहेरील नेता पंतप्रधान झाला.
डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान म्हणून देशाला आणखी पुढे नेलं. पण त्यांच्या सत्तेचा दुसरा 2009पासूनचा टप्पा वादांनी भरलेला ठरला. त्यानंतरच्या निवडणुकीतच काँग्रेस पहिल्यांदाच देशभरात तीन आकडी खासदार संख्येपासून दोन आकडी संख्याबळावर घसरली.
राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस ही पहिल्यांदाच गांधी घराण्याच्या नेतृत्वाविना होती.
पुढे शरद पवारांच्या पुढाकाराने अन्य नेत्यांनी सोनिया गांधींना गळ घातली. त्यांना राजकारणात सक्रिय केले. ना खाता, न बही, चाचा कहे वहीं सही वाले सीताराम केसरी खरंतर गांधी घराण्याशी निष्ठा राखून. पण त्यांच्या महत्वाकांक्षा वहीबाहेर जाऊ लागल्या. विरोधातील नेत्यांनी उचल खाल्ली. तालकटोरातील अधिवेशनात चाचांची वही रद्दीत टाकण्यात आली. सोनिया गांधींचा काळ सुरु झाला.

पण 1999च्या दरम्यान ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं त्याच नेत्यांना सोनिया गांधींचा विदेशी असल्याचा मुद्दा खुपू लागला. शरद पवार, तारिक अन्वर, पी. ए. संगमा काँग्रेस सोडून बाहेर पडले. त्यांनी 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तरीही काँग्रेसने पुढील 2 निवडणुका जिंकल्या.
पुढे राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. 2014, 2019 अशा दोन निवडणुका काँग्रेसने गमावल्या. त्यानंतर राहुल गांधींनी वेगळे प्रयोग सुरु केले. अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे आले. राहुल गांधी अध्यक्षपद नको म्हणाले, पण त्यांनी काँग्रेसला वेगळ्या वाटेवर नेले. राहुल ‘गांधी मार्गा’वर गेले. त्यांनी दक्षिण ते उत्तर आणि पश्चिम ते पूर्व अशा दोन भारत जोडो यात्रा काढल्या.
या यात्रांमध्ये पायी चालताना, सामान्य भारतीयांना भेटताना एक नवा नेता घडत असल्याचं अनुभवाला येत होतं. झालंही तसंच. 2024च्या निवडणुकीत नवे राहुल गांधी नव्या तडफेनं उतरले, काँग्रेसच्या जागा पुन्हा तीन आकड्यांच्या जवळ जातानाच भाजपा मात्र अल्पमतात पोहचली. पण संविधान बचावचा लोकसभेला चाललेला मुद्दा हरियाणानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही यश मिळवून देऊ शकला नाही. त्या निवडणुकांच्या एकंदरीत प्रक्रियेबद्दलच व्होटचोरी मोहीम राबवत राहुल गांधी आवाज उठवत आहेत.
भारतीय राजकारणात आजवर न झालेल्या प्रेझेंटेशनवाल्या पत्रकार परिषदा घेत आहेत. मात्र अद्यापि राहुल गांधी बदलू पाहत असलेलं राजकारणाचं हे नवं तंत्र देशाप्रमाणेच महाराष्ट्रातील काँग्रेसजनांनाही अवगत झालेलं दिसत नाही. पप्पू म्हणून भाजपानं हिणवलेले राहुल गांधी भारत जोडो यात्रेपासून एका परिपक्व प्रतिमेत गेले. पण पक्षाला त्यांच्या नव्या तंत्राला साथ देता आली, तरच काँग्रेसचा फायदा होईल. त्यांचे वडील राजीव गांधी यांनीही पक्षाला नव्या युगात आणण्याचा प्रयत्न केला. पण सहकार्य मिळालं नव्हतं. तसं आता होऊ नये, यासाठी राहुल गांधींनाच प्रयत्न करावे लागतील.

महाराष्ट्रातही काँग्रेसची परंपरा देशासारखीच, किंबहुना देशातील काँग्रेसपेक्षाही भारी. जसं टुथपेस्ट म्हटलं की कोलगेट, मोबाईल फोन म्हटलं की नोकिया, तसं राज्यात राजकीय पक्ष म्हटलं की काँग्रेसच…असं चित्र होतं. शेतकरी कामगार पक्षानं पहिला धक्का दिला. पण यशवंतराव चव्हाणांनी खांद्यावर हात टाकत शेकापच्या बहुजन नेत्यांना अलगद आपलंसं करत काँग्रेसवासी केलं. विरोधात पुन्हा तसं कुणी उरलं नाही. अपवाद संयुक्त महाराष्ट्र चळवळ काळातील होता. राज्यात जनसंघ तसा नावालाच होता.
पुढे पहिला प्रबळ विरोध झाला तोही काँग्रेसमधून बाहेर जात पण काँग्रेसचंच नाव घेत शरद पवारांनी केलेल्या पक्षांचाच. तसंच पहिला बिगर काँग्रेसी प्रयोग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे झाला. खरंतर तो पक्षही काँग्रेसनं एकेकाळी डाव्यांविरोधात बळ दिलेला.
पण शरद पवार विरोध म्यान करत काँग्रेसवासी झाले आणि राज्यात निर्माण झालेल्या काँग्रेसविरोधी राजकारणाची पोकळीमुळे संधी मिळाली. शिवसेना राज्यभरात पसरली. शिवसेनेच्या हिंदुत्वाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सोबतीला भाजपा आली. 1985नंतर राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसविरोधात खऱ्या अर्थानं बिगरकाँग्रेसी पक्ष उभे ठाकू लागले.

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण अशा व्यक्तिमत्वाच्या काँग्रेस नेत्यांची परंपरा पुढे चालवू शकले ते शरद पवारच. काँग्रेसकडे विलासराव देशमुखांसारखा नेता होता, पण तरीही काही मर्यादा होत्याच. 1985नंतर शिवसेना- भाजपासारखे बिगरकाँग्रेसी विरोधक जोर धरू लागलेले असतानाच काँग्रेसकडे राज्याचे नेते म्हणता येतील, अशा नेतृत्वाचाही अभाव दिसू लागला.
अवघ्या राज्यात लोकप्रिय, अवघ्या राज्यातील जनतेला आपला वाटणारा नेता काँग्रेसकडे राहिला नाही. पृथ्वीराज चव्हाणांसारखे चांगले नेते मुख्यमंत्रिपदीही आले, पण ते लोकनेते नाहीत. आताही राहुल गांधींनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या गांधीवादी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी नेमलं.
पण काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांना सक्रिय राखत पक्ष वाढवणं तसं सोपं काम नाही. रसदीविना राजकारण करण्याचे दिवस आता राहिलेले नाही, त्यामुळे सपकाळांचं लक्ष्य अशक्य नसलं तरी अवघड मात्र आहेच.आता काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा यशस्वी व्हायचं असेल तर सर्वसमावेशकता हीच खरी काँग्रेस संस्कृती.
काँग्रेसचं तेच खरं बळ, हे लक्षात घेत नव्या काळातील नव्या रणनीतीचं राजकारण करावं लागेल. मुंबई काँग्रेस किंवा महाराष्ट्र काँग्रेसमधील नव्या नियुक्त्यांनंतर सुरु असलेली धुसफूस पाहता, पूर्वीचं बळ नसलं तरी पूर्वीचे दोष मात्र तसेच असल्याचं दिसतं. ते दोष कसे दूर होणार? मुळात काँग्रेसच्या नेत्यांना आपला हात कमजोर का पडला त्याचं चिंतन करुन मार्ग काढायचा आहे का, हाच खरा चिंता करावी असाच प्रश्न आहे.
हे देखील वाचा –
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण
मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरले! अडवले, जाब विचारला ! मदतीच्या पिशव्यांवर शिंदेंचे फोटो पाहून संताप