National Museum Theft: हरियाणातील सोनिपत येथील अशोका युनिव्हर्सिटीतील एका 45 वर्षीय प्राध्यापकावर दिल्लीतील नॅशनल म्युझियममधून सुप्रसिद्ध मोहेंजोदाडोच्या काळातील ‘नर्तिका’ (Dancing Girl) पुतळ्याची प्रतिकृती चोरल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे.
युनिव्हर्सिटीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. नॅशनल म्युझियमचे क्लार्क निखिल कुमार यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) एका उपनिरीक्षकांकडून त्यांना फोन आला की, गॅलरीमधून नर्तिकेची प्रतिकृती चोरीला गेली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तातडीने तपासणी करण्यात आली आणि CCTV फुटेज तपासले असता, एक व्यक्ती ही प्रतिकृती उचलताना दिसला. CISF अधिकाऱ्यांनी म्युझियमच्या आवारातच त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याला पकडले. ती व्यक्ती अशोका युनिव्हर्सिटीचा प्राध्यापक होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या एका गटासोबत म्युझियमला भेट देण्यासाठी आला होता आणि ही त्याची दुसरी भेट होती. स्कॅनिंग दरम्यान, त्याच्या बॅगमध्ये त्याने म्युझियममधून विकत घेतलेले काही दगडी पुतळे, तसेच धातूची बनवलेली ही चोरीची प्रतिकृती सापडली. ही प्रतिकृती विक्रीसाठी नव्हती, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
4,500 वर्षे जुनी असलेली ही मूळ नर्तिकेची कांस्य मूर्ती 1926 मध्ये उत्खननात सापडली होती आणि तिची उंची केवळ 10.5 cm आहे.
युनिव्हर्सिटी करणार चौकशी
या घटनेनंतर CISF ने स्थानिक पोलिसांना माहिती देऊन प्राध्यापकाला त्यांच्या ताब्यात दिले. चोरलेली प्रतिकृती पोलिसांनी जप्त केली आहे. कर्तव्य पथ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात कलम 305 (e) (घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी चोरी) आणि 317 (2) (चोरीची मालमत्ता स्वीकारणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
अशोका युनिव्हर्सिटीने या घटनेबद्दल निवेदन जारी केले असून, “शनिवारी नॅशनल म्युझियममध्ये घडलेला हा प्रकार आमच्या निदर्शनास आणून दिला आहे. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी युनिव्हर्सिटी चौकशी करेल,” असे स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा – लडाखमध्ये तरुण इतके आक्रमक का झाले? काय आहेत मागण्या? जाणून घ्या