Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : ‘आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का?’; पूरग्रस्तांसमोर कर्जमाफीचा प्रश्न येताच अजित पवार संतापले

Ajit Pawar : ‘आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का?’; पूरग्रस्तांसमोर कर्जमाफीचा प्रश्न येताच अजित पवार संतापले

Ajit Pawar Flood Visit: सोलापूरसह मराठवाड्यात सध्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असून...

By: Team Navakal
Ajit Pawar

Ajit Pawar Flood Visit: सोलापूरसह मराठवाड्यात सध्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असून गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने नागरिक सरकारी मदतीच्या आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

परांडा तालुक्यातील देवगाव खुर्द येथील नुकसानीची पाहणी करत असताना अजित पवार ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. मात्र, यावेळी शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले.

‘कर्जमाफी’च्या प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला

उपमुख्यमंत्री पवार ग्रामस्थांना धीर देत असतानाच, उपस्थित असलेल्या एका शेतकऱ्याने थेट कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारला. कर्जमाफीची मागणी ऐकून अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी नाराजी व्यक्त करत त्या शेतकऱ्याला सडेतोड उत्तर दिले.

अजित पवार नेमके काय म्हणाले?

“अरे बाबा, आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का? मी सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. सहा वाजता मी करमाळ्यात होतो. जो माणूस जीव तोडून काम करतो ना. मी एवढा जीव तोडून सांगतोय, तेही जरा ऐका.”

पवारांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या कामाची आकडेवारी सांगितली. “आम्ही काय झोपा काढल्या नाहीत. लोकांना रात्री-अपरात्री कधीही फोन केले, ते उचलले आणि शक्य ती मदत पाठवली. आम्ही लाडक्या बहिणींना दरवर्षी 45 हजार कोटी रुपये ची मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफ केली, त्याचे 20 हजार कोटी रुपये भरतोय. एवढं करूनही कोणी असं बोललं की वाईट वाटतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आम्ही इतकं जीवाचं रान करतोय आणि यांना काहीतरी तिसरंच काढायचं आहे.”

“याला द्या रे मुख्यमंत्रीपद” अशा शब्दांत त्यांनी त्या मागणी करणाऱ्या तरुणाला उद्देशून टिपण्णी केली.

“पैशाचं सोंग करता येत नाही”

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, “हे राज्य चालवत असताना लोकांचे उद्ध्वस्त झालेले संसार परत कसे उभे करता येतील, लोकांना मदत कशी करता येईल, जमिनी पूर्ववत कशा आणायच्या, घरं परत कशी बांधून द्यायची, याचा आम्ही विचार केला आहे आणि आम्ही या सगळ्या गोष्टी करू. बाबांनो, सगळी सोंगं करता येतात. पण पैशाचं सोंग करता येत नाही.”

शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.

हे देखील वाचा –

 निधिवनराज, बांके बिहारी मंदिरांना राष्ट्रपतींची भेट; अर्धा तास प्रदक्षिणा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या