Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांना ट्रोल करणाऱ्या टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. इतर राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या तुलनेत आपली जीवनशैली वेगळी आहे आणि मला जसे आवडते तसे मी वागते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ट्रोलिंगमुळे आपल्याला कोणताही फरक पडत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
काही दिवसांपूर्वी स्वच्छता मोहिमेदरम्यान त्यांनी परिधान केलेल्या कपड्यावरून अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आले होते. आता एका कार्यक्रमात बोलताना त्यांनीयावर भाष्य केले.
स्वच्छता मोहिमेवरून का झाले ट्रोल?
अमृता फडणवीस गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी, जुहू समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) तसेच लहान मुलांची टीम होती. त्यांनी समुद्रामधील निर्माल्य आणि मूर्ती हटवून चौपाटी स्वच्छ केली.
या मोहिमेऐवजी, ट्रोलर्सनी त्यांनी परिधान केलेल्या पोशाखावरून त्यांना लक्ष्य केले होते. या ट्रोलिंगवर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “असे अनेक प्रसंग घडले आहेत, जेव्हा सोशल मीडियावर लोक माझ्याबाबत ओव्हर रिअॅक्ट होतात. अशा अनावश्यक गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून लोकांचे लक्ष विचलित करतात.”
अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सच्या मानसिकतेवर थेट टीका केली. त्या म्हणाल्या, “स्वच्छता मोहीम, पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा संदेश, आणि समाजातील घटकांचे एकत्र येणे हा मुख्य विषय होता. पण ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवून, माझ्या कपड्यांवर लक्ष केंद्रित केले. हे वाईट सोशल मीडिया हँडल्स कुप्रसिद्ध आहेत, त्यांना यासाठी पैसे दिले जातात आणि ते त्यानुसार वागतात.”
ज्या महिलेकडे स्वतःचा आवाज आहे, जी समस्या व्यवस्थित समजू शकते, तिला ट्रोलर्स लक्ष्य करणारच, असे मत त्यांनी व्यक्त केले. “हे केवळ माझ्याबाबतीत नाही, तर प्रत्येक स्वतंत्र महिलेला लागू होते. जेव्हा तुमच्याकडे तुमचा आवाज असतो, तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो,” असे त्या म्हणाल्या.
“मला हे ट्रोलर्स बॅकग्राउंड म्यूझिकसारखे वाटतात. तुम्ही ते कर्कश्य आहे, असे समजून त्रास करून घ्यायचा की, त्यावर नाच करत ठेका धरायचा, हे तुम्हाला ठरवायचे आहे. तुम्ही त्यांना टाळू शकता किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकता. काय करायचे, हा निर्णय तुमचा असला पाहिजे.”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
वैयक्तिक आयुष्यावर या ट्रोलिंगचा परिणाम होतो का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी आणि देवेंद्र फडणवीस रात्री जेवणाच्या वेळी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतो. “देवेंद्रजी महिला सक्षमीकरणावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. शिवाय, माझ्या सासरच्या लोकांनी आणि माझ्या पालकांनी आम्हाला आमची स्पेस दिली आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेवर मला घरी स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या विचारांचा आदर करतो.”, असेही त्या म्हणाल्या.
हे देखील वाचा – Ajit Pawar : ‘आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का?’; पूरग्रस्तांसमोर कर्जमाफीचा प्रश्न येताच अजित पवार संतापले